हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघासमोर तुल्यबळ ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. भारतीय संघाने तीनपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताला विजयासाठी संघर्ष करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने मात्र भारतावर थरारक विजय मिळवत बाजी मारली. जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मन्धाना आणि हरमनप्रीत कौर या तिघींपैकी एकीला मोठी खेळी करण्याची आवश्यकता आहे. भारतीय संघाला क्षेत्ररक्षणातही अमूलाग्र बदल करावा लागणार आहे. भारतीय संघाला सहाव्या गोलंदाजाचीही आवश्यकता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हाणामारीच्या षटकात सामना भारताच्या हातून निसटला होता. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानेही तीन सामने खेळले आहेत. दोनमध्ये त्यांनी विजय मिळवला तर श्रीलंकेविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली होती.

स्मृती मन्धानाचं अर्धशतक

कॅलेंडर वर्षात १००० धावांचा टप्पा ओलांडण्याचा अनोखा विक्रम नावावर करणाऱ्या स्मृतीने अर्धशतकाचा टप्पा गाठला. सुरुवातीच्या पाच षटकात सावध खेळणाऱ्या स्मृतीने खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं.

स्मृती-प्रतिकाची आश्वासक सुरुवात

स्मृती मान्धना आणि प्रतिका रावळ यांनी ऑस्ट्रेलियाच्या तुल्यबळ आक्रमणासमोर ६ षटकात २३ धावा करत चांगली सुरुवात केली आहे. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये विकेट्स गमावण्याची चूक भारतीय संघाने टाळली आहे.

भारताचा संघ कायम
भारतीय संघात कोणताही बदल नसल्याचं कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्ट केलं. भारतीय संघ- प्रतिका रावळ, स्मृती मन्धाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनज्योत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरानी

ऑस्ट्रेलियाच्या संघात एक बदल
ऑस्ट्रेलियाने जॉर्जिओ वारेहमच्या जागी सोफी मोलिनक्सला संघात समाविष्ट केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ- एलिसा हिली, फोब लिचफिल्ड, एलिसा पेरी, बेथ मूनी, अनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहिला मॅकग्रा, सोफी मॉलिनक्स, किम गरॅथ, अॅलना किंग, मेगन शूट