मुंबई : साल २०११… मुंबईचे वानखेडे स्टेडियम. भारतीय पुरुष संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मारलेला तो षटकार आणि त्यानंतर स्टेडियममध्ये झालेला तो जल्लोष कोणीही विसरू शकत नाही. त्यानंतर १४ वर्षांनी २०२५ मध्ये नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये फिरकीपटू दीप्ती शर्माच्या चेंडूवर कर्णधार हरमनप्रीत कौरने दक्षिण आफ्रिकेची फलंदाज नदीन डी क्लर्कचा झेल पकडत भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रथमच विश्वविजेतेपदाचे बिरुद मिळवून दिले आणि रविवारी महिला क्रिकेटपटूंचा जल्लोषही तसाच संस्मरणीय ठरला.

याच मैदानावर महिला संघाने जेमिमा रॉड्रिग्जच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामन्यात संस्मरणीय विजय साकारला होता. या निर्णायक कामगिरीमुळे रविवारी संपूर्ण सामन्यात ‘जेमी…जेमी’चा आवाज ऐकू येत होता. चषक उंचावल्यानंतर आपले नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींमध्ये गुंतलेल्या भारतीय खेळाडूंना मागे पाहण्यासही वेळ नव्हता. मात्र, त्यातही उपविजेत्या ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे सांत्वन करण्यास त्या विसरल्या नाहीत. मारिझान कापला अश्रू अनावर झाले. जेमिमा आणि राधा यादवने तिला मिठी मारत दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला.

पारितोषिक वितरण समारंभानंतर हरमनप्रीत कौर पत्रकार परिषदेत चषक घेऊन आली. ‘‘आम्ही स्पर्धेची सुरुवात चांगली केली. मात्र, मधल्या काळात आम्ही काही सामने गमावले. त्यानंतर आमचे सामने डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम येथे होणार होते. न्यूझीलंडविरुद्धचा सामना खेळण्यापूर्वी मी संघाला म्हटले, आता विश्वचषकात जे काही झाले ते विसरा. आता आपण डी. वाय. पाटील येथे सामने खेळणार आहोत. या मैदानावर आल्यानंतर आमची कामगिरी उंचावली. आम्ही एकामागोमाग एक निर्णायक विजय मिळवले. आता आम्ही विश्वचषक उंचावला तोही याच मैदानावर. यापेक्षा चांगले काहीच असू शकत नाही. या मैदानावर नेहमीच चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळतो. अंतिम सामन्यात पाऊस असतानाही ते आमच्यासाठी आले यासाठी त्यांचे मनापासून आभार. आम्ही चाहत्यांच्या पाठिंब्यामुळेच इथवर पोहोचलो आहोत,’’ असे पत्रकार परिषदेत हरमनप्रीत म्हणाली.

पत्रकार परिषद संपल्यानंतर हरमनप्रीतने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना चषक उंचावण्यास सांगितले. मात्र, प्रतिनिधींनी तसे केले नाही. यानंतर हरमनप्रीतने ‘सेल्फी’ घेण्यासाठी फोन देण्यास सांगितले. यानंतर सर्वांनीच या आनंदात सहभागी होऊन उत्साहाने ‘सेल्फी’ काढला. स्मृती मनधानासह पलाश मुच्छल होता, दोघेही जेव्हा ड्रेसिंग रूममधून निघाले तेव्हा स्मृतीचे हेल्मट त्याच्या हातात होते. संघाने हॉटेलकडे कूच केले, तेव्हा पंजाबी गाणी ऐकण्यास मिळाली. तसेच हॉटेलमध्येही विश्वविजेत्या संघाचे जोरदार स्वागत झाले.

महिला संघाचे ‘स्फूर्ती’ गीत

सांघिक गीत किंवा ‘स्फूर्ती’ गीत हे ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संस्कृतीचा भाग राहिला आहे. ॲशेस किंवा विश्वचषक जिंकल्यानंतर स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग यांनी ‘अंडर द सदर्न क्रॉस’ गीत गायले आहे. भारतीय क्रिकेट संघही जिंकल्यानंतर स्टेडियममध्ये ‘चक दे इंडिया’, ‘सुनो गौर से दुनिया वालो’ आणि ‘लहरा दो’ हे गाणे वाजते. महिला संघ हॉटेलमध्ये परतण्याच्या आधी सर्वजण खेळपट्टीच्या २२ यार्डात एकत्र आले. सर्व खेळाडू, प्रशिक्षकांचा चमू आणि अन्य सर्व सहाय्यकांनी घेरा बनवीत ‘स्फूर्ती’ गीत म्हटले. संपूर्ण संघाने ‘रहेगा सब से ऊपर, हमारा तिरंगा…हम हैं टीम इंडिया’ म्हटले तेव्हा त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. यामध्ये मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदारचा आवाज स्पष्ट ऐकण्यास मिळत होता. ‘साथ में चलेंगे, साथ में उठेंगे, हम हैं टीम इंडिया, साथ में जीतेंगे’ सर्वांनी मिळून प्रथमच हे गीत गायले.