Fastest Century In Womens T20 Cricket: क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी देखील क्रिकेटमध्ये बरीच प्रगती केली आहे. भारतीय महिला संघाकडून खेळणाऱ्या किरण नवगिरेने महिलांच्या क्रिकेटमधील एक मोठा विक्रम मोडून काढला आहे.

किरण नवगिरेने सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम मोडून काढला आहे. अवघ्या ३४ चेंडूत शतक झळकावून तिने क्रिकेट विश्वातील अनेक स्टार खेळाडूंना मागे टाकलं आहे. किरण नवगिरेची विक्रमी खेळीवरिष्ठ महिला टी -२० ट्रॉफी स्पर्धेत १७ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात महाराष्ट्र आणि पंजाब हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

या सामन्यात किरण नवगिरेच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. तिने अवघ्या ३४ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान तिने ३५ चेंडूत नाबाद १०६ धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान तिने ३०२.८६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना १४ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार मारले. यासह ती महिलांच्या टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारी फलंदाज ठरली आहे.

याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या सोफी डिवाईनच्या नावावर होता. सोफी डिवाईनने अवघ्या ३६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं. किरणला भारतीय संघाकडून ६ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यात फलंदाजी करताना तिने पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे विरोधी संघातील गोलंदाजांना पुनरागमन करण्याची संधीच मिळाली नाही.

या सामन्यात महाराष्ट्र संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. पंजाबने महाराष्ट्र संघासमोर विजयासाठी १११ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान महाराष्ट्र संघाने ८ षटकात पूर्ण केले. किरण नवगिरेने महाराष्ट्र संघाकडून एकतर्फी खेळ केला. महाराष्ट्राकडून किरण नवगिरे आणि ईश्वरी सावकर फलंदाजीला आली. पण ती स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर किरणने गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. महाराष्ट्र संघाला विजयासाठी अवघ्या १११ धावा करायच्या होत्या. त्यापैकी १०६ धावा या किरणने केल्या होत्या.