Prasidha Krishna married his girlfriend Rachna: भारतीय संघ ७ जूनपासून इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळत आहे. सामना सुरू झाल्यानंतर एका दिवसानंतर भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्याचे लग्न झाले आहे. प्रसिद्ध कृष्णाने त्याची गर्लफ्रेंड रचना कृष्णासोबत लग्न केले आहे. गेल्या मंगळवारी (६ जून) प्रसिद्ध कृष्णाच्या एंगेजमेंटची बातमी समोर आली होती.

प्रसिद्ध कृष्णा आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करतो. राजस्थान रॉयल्सच्या स्टार फास्ट बॉलरने त्याची गर्लफ्रेंड रचना कृष्णासोबत लग्न केले आहे. याआधी दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. आता दोघेही पवित्र बंधनात बांधले गेले आहेत. त्याच वेळी, प्रसिद्ध कृष्णा बराच काळ जखमी झाला होता. यामुळे तो आयपीएल २०२३ लाही मुकला होता. आता त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या पारंपरिक पद्धतीने लग्न केले –

स्टार वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि रचना कृष्णा यांचा विवाह दक्षिण भारतीय पारंपारिक पद्धतीने झाला. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रसिद्धने धोतर नेसले आहे. त्याचबरोबर रचनाने लाल रंगाची साडी घातली आहे. यावरुन असे दिसते की त्यांनी त्यांच्या दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. वास्तविक, प्रसिद्ध बंगळुरूचा आहे.

हेही वाचा – IND vs AUS: “जर टीम इंडियाची…”; रवी शास्त्रींनी भारतीय संघाच्या मानसिकतेवर उपस्थित केला प्रश्न

आतापर्यंतची प्रसिद्ध कृष्णाची आयपीएल कारकीर्द –

प्रसिद्ध कृष्णाने ६ मे २०१८ रोजी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने एकूण ५१ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने ३४.७६ च्या सरासरीने ४९ विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्यांची इकॉनॉमी८.९२ राहिली आहे.

भारतासाठी वनडे पदार्पण –

प्रसिद्ध कृष्णाने २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. कृष्णाने आतापर्यंत १४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने गोलंदाजी करताना २३.९२ च्या सरासरीने २५ बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याने ५.३२ च्या इकॉनॉमीसह धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ४/१२ आहे.