सिंगापूर : भारतीय फुटबॉल संघाला सिंगापूरविरुद्धच्या आशिया चषक पात्रता सामन्यात १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. उत्तरार्धात भारतीय संघाला बहुतांश वेळ १० खेळाडूंसह खेळावे लागले. यानंतरही भारताने संयमाने खेळ करत सामना बरोबरीत सोडवला.

‘क’ गटाच्या या सामन्यात पूर्वार्धातील भरपाई वेळेत इखसान फंडीने गोल करीत सिंगापूरला आघाडी मिळवून दिली. मात्र, सामन्याच्या ९०व्या मिनिटाला सिंगापूरच्या जॉर्डन एमाविवेकडून झालेल्या स्वयंगोलमुळे सामना १-१ असा बरोबरीत राहिला. भारताचा बचावपटू संदेश झिंगनला ४७व्या मिनिटाला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्यामुळे उर्वरित सामन्यात भारताला १० खेळाडूंनीशी खेळावे लागले.

भारताचे आता तीन सामन्यांनंतर दोन गुण झाले आहेत. याआधी भारताने बांगलादेशविरुद्ध गोलशून्य बरोबरीची नोंद केली होती, तर हाँगकाँगकडून त्यांना ०-१ अशा पराभवाचा सामना करावा लागला. आशिया चषकात स्थान मिळवायचे झाल्यास भारतीय संघाला आता कामगिरीत मोठी सुधारणा करावी लागणार आहे.