भारताच्या २३ वर्षांखालील फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकांची नाराजी

भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टन्टाइन यांनी अल्प दिवसांत २३ वर्षांखालील पुरुष संघाची बांधणी करणे आव्हानात्मक असल्याचे सांगून येथील खेळाडू घडविण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

कतार येथे होणाऱ्या आशियाई चषक पात्रता स्पध्रेसाठी भारतीय संघाचे सराव शिबीर नवी दिल्लीतील आंबेडकर स्टेडियमवर सुरू आहे. आशियाई चषक पात्रता स्पध्रेत भारतासमोर सीरिया, तुर्कमेनिस्तान आणि यजमान कतारचे आव्हान आहे.

या स्पध्रेच्या तयारीसाठी खेळाडू दहा दिवस एकत्र सराव करीत आहेत आणि या अल्प कालावधीत मजबूत संघबांधणी होऊच शकत नाही, असे कॉन्स्टन्टाइन यांनी स्पष्ट केले.

‘‘कतार, सीरिया व तुर्कमेनिस्तान या संघांमध्ये आणि भारतीय संघ यांच्यातील फरक मला सांगायला आवडेल. या संघांमधील खेळाडू गेली चार-पाच वष्रे एकत्र खेळत आहेत आणि आम्ही केवळ दहा दिवसांपासून एकत्र आहोत. हा प्रमुख फरक

आहे. १७ ते १९ वर्षांखालील आणि १९ ते २३ वर्षांखालील संघातील प्रवासात आपल्याकडे सातत्यपूर्ण कार्यरत असलेली रचना नाही. यातील काही खेळाडू कदाचित एकमेकांना १९ वर्षांखालील संघापासून ओळखत असतीलही. त्यामुळे एका आठवडय़ात किंवा दहा दिवसांत संघ घडवणे आव्हानात्मक आहे. आम्ही विजयासाठी प्रयत्नशील राहू, पराभवासाठी तेथे आम्ही जाणार नाही, परंतु खेळाडूंना समन्वय राखणे कठीण जाणार आहे,’’ असे कॉन्स्टन्टाइन यांनी सांगितले.