तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पाचव्यांदा मुष्टियुद्धात आशियायी अजिंक्यपद मिळवणाऱ्या मेरी कोमने ज्या स्त्रीला पुढे जायचंच असतं तिच्यासाठी कोणतीही गोष्ट अडथळा ठरू शकत नाही, हेच दाखवून दिलं आहे.

भारतीय स्त्री चूल आणि मूल यांमध्ये गुरफटलेली असते असंच मानलं जातं. या चौकटीला छेद देत काही स्त्री खेळाडूंनी केवळ देशामधील नव्हे तर जगातील कोटय़वधी लोकांकरिता आदर्श निर्माण केला आहे. सुपरमॉम म्हणून लोकप्रियता मिळविलेली एम. सी. मेरी कोम ही अशाच मुलखावेगळ्या स्त्रियांमध्ये गणली जाते. अतिशय संघर्ष करीत तिने मुष्टियुद्धासारख्या रांगडय़ा खेळात नावलौकिक मिळविला आहे. आजपर्यंत पाच वेळा विश्वविजेतेपद, पाच वेळा आशियाई विजेतेपद व एकदा ऑलिम्पिक कांस्यपदक अशी वैभवशाली कामगिरी तिने केली आहे. मात्र या प्रत्येक पदकास अतुलनीय संघर्षांची रुपेरी किनार लाभली आहे.

आपला जन्मच संघर्षांसाठी झाला आहे असे मानणाऱ्या मेरी कोमला मुष्टियुद्धाच्या कारकीर्दीत अनेक वेळा हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. दोन अपत्ये झाल्यानंतर तिने ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला बॉक्सर आहे. तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतरही पुन्हा या खेळातील करिअर पुढे नेताना तिने पाचव्यांदा आशियायी अजिंक्यपदावर आपली मोहोर नोंदविली व ऐतिहासिक कामगिरी केली. आपल्या प्रत्येक पदकास स्वतंत्र कथानक आहे असे तिने आशियाई सुवर्णपदक जिंकल्यानंतर मत व्यक्त केले होते. त्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. ऑलिम्पिकसाठी वरच्या वजनी गटात भाग घेताना तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. वरच्या गटात भाग घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. वजन वाढविण्याबरोबरच त्यामुळे होणाऱ्या अनिष्ट परिणामांनाही तिला तोंड द्यावे लागले. पण त्याहीपेक्षा या गटात अगोदरपासून स्थिरावलेल्या अनुभवी खेळाडूंचेही तिच्यापुढे आव्हान होते. या खेळाडूंची शैली, त्यांच्या सवयी, त्यांचे पदलालित्य आदी गोष्टींचा अभ्यास करणे सोपे नव्हते. तथापि मेरी कोमने या सर्वच गोष्टी मनापासून करीत या समस्यांवरही मात केली.

खरंतर अ‍ॅथलेटिक्स या खेळात करिअर करण्याची तिची इच्छा होती. मणिपूरमधील दिंग्कोसिंगने आशियाई स्पर्धेत मुष्टियुद्धात सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्याची छाप मणिपूरमधील युवा खेळाडूंवर पडली नसती तर नवलच. आपणही त्याच्यासारखे बॉक्सर व्हावे असे मेरीला वाटू लागले. मात्र बॉक्सिंगमध्ये स्त्रियांनी भाग घेतला तर ठोशांमुळे त्यांच्या चेहरा वाकडातिकडा होतो व त्यांचे लग्न जमण्यास अडचणी निर्माण होतात, असा गैरसमज असल्यामुळे तिला या खेळासाठी घरातून वडिलांकडून भरपूर विरोध झाला. या विरोधास न जुमानता तिने १९९९ मध्ये स्पर्धात्मक मुष्टियुद्धाचा सराव सुरू केला. मेरीने जिंकलेल्या लढतींची छायाचित्रे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्यानंतर वडिलांनी तिला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. तिने २००२ ते २०१० या कालावधीत पाच वेळा विश्वविजेतेपद पटकाविले.

लंडन येथे २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच स्त्रियांच्या मुष्टियुद्धाचा समावेश करण्यात आला. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणे ही काही सोपी गोष्ट नाही. विश्वविजेतेपदाच्या तुलनेत ऑलिम्पिककरिता अहोरात्र मेहनत करावी लागते व अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो याची पुरेपूर जाणीव मेरीला होती. तिने अनेक ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला होता. आपल्याला हे पदक मिळवायचे असेल तर घरापासून दूर राहून सराव केला पाहिजे, अशी खूणगाठ तिने मनाशी बांधली होती. चार वर्षांच्या जुळ्या मुलांपासून दूर राहून सराव केला तरच सरावात कोणताही व्यत्यय येणार नाही याची तिला खात्री होती. मनाने कणखर बनत घरापासून हजारो मैल दूर असलेल्या पुणे शहरातील शिवछत्रपती क्रीडानगरीत सराव करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा सराव सुरू असताना घरची सर्व आघाडी तिचे पती ओनखोलर व कुटुंबीयांनी सांभाळली होती.

पुण्यातील सराव शिबिरात चार्ल्स अ‍ॅटकिन्सन या परदेशी तज्ज्ञाचे  मार्गदर्शन, स्वतंत्र आहारतज्ज्ञ, फिजिओ, मसाजिस्ट आदी सर्वाची मदत तिला मिळाली. चिनी खेळाडूंना सराव शिबिर सुरू असताना घरच्या  माणसांबरोबर बोलण्यास परवानगी नसते. घरच्यांसमवेत बोलताना त्यांचे सरावावरील लक्ष घरच्या गोष्टींकडे जाऊ नये आणि त्याचा परिणाम सरावातील कामगिरीवर होऊ नये, हा त्यामागचा हेतू असतो.

मेरीची मुले खूप लहान असल्यामुळे तिचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून तिच्या प्रशिक्षकांनी तिला मोबाइलवर बोलण्याबाबतही बंधन घातले होते. आठवडय़ातून फक्त एकदा नवऱ्याशी तर १५ दिवसांमधून फक्त एकदा मुलांबरोबर बोलण्यास तिला परवानगी देण्यात आली होती. मेरी कोमसाठी ही खूप अवघड गोष्ट होती. मात्र मेरी मनाने खूप खंबीर आहे. ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी हा त्याग आवश्यक आहे असे मानून तिने फक्त सरावावर लक्ष केंद्रित केले होते. पुण्यातील सराव शिबिरात अनेक महिने दररोज १०-१० तास ती सराव करीत असे. खेळाच्या सरावाबरोबरच पूरक व्यायामही तिला करावा लागला. पुरुष खेळाडूंबरोबर सराव करताना तिने कोणताही संकोच मानला नाही. पुरुष खेळाडूंकडून तिने ठोसेही खाल्ले. स्त्री खेळाडू म्हणून पुरुष खेळाडूंच्या तुलनेत तिला सवलत देण्यास परदेशी प्रशिक्षक तयार नसत. त्यामुळेच अ‍ॅटकिन्सन हे तिच्याकडून कठोर मेहनत करून घेत असत. मेरी कोमसाठी हा अवघड कालावधी असला तरी या मेहनतीमुळेच तिचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार झाले.

लंडन ऑलिम्पिकनंतर पुन्हा रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी ती उत्सुक होती. मात्र राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक  मतभेदांमुळे तिला पात्रता फेरीत अपेक्षेइतके यश  मिळविता आले नाही. तिची ही संधी हुकली. त्यानंतरही तिने करिअर सुरू ठेवले. यंदा आशियाई स्पर्धेपूर्वी तिला दोन-तीन स्पर्धामध्ये अपेक्षेइतके यश मिळविता आले नाही. त्यामुळे तिने निवृत्त होऊन संसारावर लक्ष केंद्रित करावे, अशी टीकाही तिला सहन करावी लागली. मात्र पराभवामुळे निराश न होता कमालीची जिद्द दाखवीत तिने आणखी कठोर मेहनत केली. पुढील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असल्यामुळे तेथे तिला याच वजनी गटात सुवर्णपदकाची संधी आहे. ही दूरदृष्टी ठेवीत तिने ५१ किलोऐवजी ४८ किलो गटात भाग घेण्यास सुरुवात केली. वजन कमी करतानाही तिला खूप शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपण अद्यापही सोनेरी कामगिरी करू शकतो हे दाखविण्यासाठी मेरीने हे आव्हानही स्वीकारले आणि आशियाई सुवर्ण पदकावर मोहोर नोंदविली.

मेरीची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपण केवळ शोभेच्या खासदार नसून लोकांच्या, विशेषत: खेळाडूंच्या समस्यांना वाचा फोडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, हे ओळखूनच मिळेल तेव्हा ती खासदारकीची कर्तव्ये पार पाडत असते. त्याखेरीज आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या उपसमितीवर ती काम करते. तसेच भारतामधील अनेक बिगरशासकीय सामाजिक संस्थांवर ती कार्यरत आहे. मणिपूरमधील उदयोन्मुख खेळाडूंकरिता तिने मुष्टियुद्ध अकादमी सुरू केली आहे. तेथेही ती मार्गदर्शनाचे काम करते. ऑलिम्पिक कांस्यपदकानंतर मिळालेल्या पारितोषिकांचा विनियोग ती अशा अकादमी व अन्य सामाजिक उपक्रमांवर खर्च करीत असते. दिवसातील २४ तासही आपल्याला कमी पडतात असे ती नेहमी सांगत असते. तीन मुलांची आई, खासदार, प्रशिक्षक, खेळाडू व संघटक अशा सर्वच भूमिका पार पाडताना तिला तारेवरची कसरत करावी लागते. तथापि त्याबाबत कोणतीही तक्रार न करता ती या सर्व भूमिकांना योग्य न्याय देते. खऱ्या अर्थाने ती जगातील मुलखावेगळी सुपरमॉम आहे.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा