पीटीआय, कोलकाता
Indian Premier League Cricket पहिल्या लढतीत पराभव, दुखापती आणि प्रमुख खेळाडूंची अनुपब्धता या आव्हानांना मागे सारत कोलकाता नाइट रायडर्स संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये विजयी पुनरागमनासाठी उत्सुक आहे. गुरुवारी कोलकाता संघाचा तारांकित खेळाडूंचा भरणा असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाशी सामना होणार आहे.
कोलकाताच्या संघासाठी यंदाच्या हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सलामीच्या लढतीत पंजाब किंग्जने डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार कोलकाता संघाचा पराभव केला. त्यानंतर कोलकाता संघाला दोन धक्के बसले. नियमित कर्णधार श्रेयस अय्यरने पाठीच्या दुखापतीमुळे, तर अष्टपैलू शाकिब अल हसनने कौटुंबिक कारणास्तव यंदाच्या संपूर्ण हंगामातून माघार घेतली. त्यामुळे कोलकाता संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
श्रेयस पाठीच्या दुखापतीतून सावरेल आणि ‘आयपीएल’च्या उत्तरार्धात खेळेल अशी कोलकाताच्या संघाला आशा होती. परंतु त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया होणार असल्याने तो संपूर्ण हंगामालाच मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हंगामी कर्णधार नितीश राणावरील जबाबदारी अधिकच वाढली आहे.
कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवर तब्बल १४३८ दिवसांनी ‘आयपीएल’चा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला कोलकाताचा संघमालक आणि प्रसिद्ध सिनेअभिनेता शाहरुख खान उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यातच प्रतिस्पर्धी बंगळूरु संघात विराट कोहलीसारखा खेळाडू असल्याने या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असेल.
कोलकाता आणि बंगळूरु या संघांची हंगामाची सुरुवात भिन्न राहिली आहे. कोलकाताला सलामीच्या लढतीत पंजाबकडून पराभव पत्करावा लागला, तर बंगळूरुने पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सवर सहज मात केली.
रसेल, नरीनवर मदार
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत कोलकाता संघाच्या फलंदाजीची भिस्त वेस्ट इंडिजचा तडाखेबंद अष्टपैलू आंद्रे रसेलवर आहे. रसेलने पहिल्या सामन्यात आक्रमक पावित्र्यासह खेळताना १९ चेंडूंत ३५ धावा फटकावल्या होत्या. मात्र, त्याने आणखी मोठी खेळी करणे आवश्यक आहे. तसेच त्याने गोलंदाजीत योगदान देणेही गरजेचे आहे. फलंदाजीत कर्णधार नितीश राणा, वेंकटेश अय्यर आणि रहमनुल्ला गुरबाझ यांना रसेलला साथ द्यावी लागेल. कोलकाताकडे टीम साऊदी आणि फिरकीपटू सुनील नरीन यांसारखे अनुभवी गोलंदाज उपलब्ध आहेत. तसेच उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर या वेगवान भारतीय गोलंदाजांचा पर्यायही कोलकाताकडे आहे. या चौघांनी लौकिकाला साजेशी कामगिरी करणे गरजेचे आहे.
कोहली, फॅफवर नजर
बंगळूरुच्या संघाने यंदा सलामीच्या लढतीत मुंबईवर मोठा विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली (४९ चेंडूंत नाबाद ८२) आणि कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिस (४३ चेंडूंत ७३) यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांवर दडपण टाकले. आता कोलकाताच्या फलंदाजीस अनुकूल खेळपट्टीवरही या दोघांच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल. या दोघांना आक्रमक सलामी देण्यात यश आल्यास मधल्या फळीत दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल आणि शाहबाज अहमद यांसारखे फटकेबाजी करणारे फलंदाज बंगळूरुकडे आहेत. गोलंदाजीत बंगळूरुकडे मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि आकाश दीप यांसारखे प्रतिभावान वेगवान गोलंदाज आहेत. फिरकीची धुरा शाहबाज, मॅक्सवेल आणि करण शर्मा सांभाळतील.
’ वेळ : सायं. ७.३० वाजता
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा
