नवी दिल्ली : जानेवारी २०२३मध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेमधील नव्या ट्वेन्टी-२० लीगच्या सहाही संघांची खरेदी करण्यासाठी इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) उद्योग समूहांनी मोर्चेबांधणी केली आहे.
मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या ‘आयपीएल’ संघांनी आफ्रिकेमधील लीगसाठी लिलावामध्ये बोली लावली आहे. चेन्नई सुपर किंग्ज लिमिटेडने जोहान्सबर्ग संघासाठी उत्सुकता दर्शवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या मुंबई इंडियन्सने केप आऊन, तर सनरायजर्स हैदराबादच्या मालकीच्या सन टीव्ही ग्रुपने पोर्ट एलिझाबेथ संघांसाठी औत्सुक्य दाखवले आहे. गतवर्षी लखनऊ संघासाठी ७०९० कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक करणाऱ्या आरपी संजीव गोएंका समूहाने दरबान संघासाठी, राजस्थान रॉयल्सने पार्ल संघासाठी, तर दिल्ली कॅपिटल्सच्या जिंदाल स्पोर्ट्सने प्रिटोरिया संघांसाठी दावेदारी केली आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिका मंडळाकडून लवकरच नव्या संघांच्या मालक कंपन्यांची घोषणा करण्यात येणार आहे. या संघटनेकडून हा तिसऱ्यांदा ट्वेन्टी-२० लीगसाठी प्रयत्न होत आहे. २०१७मध्ये ग्लोबल लीग ट्वेन्टी-२० अपयशी ठरली. त्यानंतर झँसी सुपर लीग तीन वर्षे सामन्यांचे प्रक्षेपणकर्ते न सापडल्यामुळे बंद करावी लागली.