पीटीआय, लखनऊ

वेगवान गोलंदाज मयांक यादवच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर गेल्या दोन सामन्यांत विजय मिळवणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सचा रविवारी गुजरात टायटन्स संघाशी होणार आहे. या सामन्यात लखनऊचा प्रयत्न विजयी हॅट्ट्रिक नोंदवण्याचा असणार आहे.

मयांकने आपल्या गतीने सर्वाना प्रभावित केले आहे. गेल्या दोन सामन्यांत त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. या २१ वर्षीय वेगवान गोलंदाजाने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात २७ धावांत ३ बळी मिळवले. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध त्याने १४ धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडले. लखनऊचा संघ तीन सामन्यांत दोन विजयांसह चौथ्या स्थानी आहे. तर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने दोन सामन्यांत विजय मिळवले. तर, दोन लढतींत त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

हेही वाचा >>>RR vs RCB : विराट कोहलीच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, २००९ नंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये असं घडलं

डीकॉक, राहुलवर भिस्त

मयांक यादवच्या कामगिरीमुळे त्याच्या भारतीय संघातील सहभागाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यासाठी कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. लखनऊकडे क्विंटन डीकॉक व केएल राहुलच्या पाने चांगली सलामी जोडी आहे. डीकॉकने गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या लढतीत राहुलकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा असणार आहे. वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन व भारतीय अष्टपैलू कृणाल पंडय़ाने आपल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या आहे. मात्र, देवदत्त पडिक्कल व ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोइनिस यांची लय संघाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीत मयांकला नवीन-उल-हक, यश ठाकूर, मोहसिन खान व लेग स्पिनर रवी बिश्नोईची साथ मिळेल.

हेही वाचा >>>IPL 2024, RR vs RCB : बटलरचं शतक कोहलीच्या शतकावर भारी, राजस्थानने साकारला बंगळुरूवर विजय

गिल, विल्यम्सनवर नजर

गुजरातचा कर्णधार शुभमन गिल या हंगामात चांगल्या लयीत आहे. त्याने गेल्या सामन्यांत ४८ चेंडूंत नाबाद ८९ धावा केल्या होत्या. या सामन्यातही त्याचा प्रयत्न चांगल्या कामगिरीचा असेल. बी साई सुदर्शनही चांगल्या लयीत दिसत आहे. मात्र, विजय शंकर व वृद्धिमान साहासारख्या खेळाडूंकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. संघाकडे मध्यक्रमात डेव्हिड मिलरसारखा आक्रमक फलंदाज आहे. गोलंदाजीत मोहित शर्माने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, त्याला अझमतुल्ला ओमरझई, उमेश यादव, रशीद खान व नूर अहमदसारख्या खेळाडूंकडून चांगले सहकार्य अपेक्षित आहे.

वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.