Shubman Gill Idol: शुबमन गिलकडे भारतीय क्रिकेटचा भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. कमी वयात त्याच्याकडे भारतीय कसोटी संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासह वनडे आणि टी-२० संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देखील गिलकडे सोपवण्यात आली आहे. कर्णधार म्हणून त्याने पहिल्याच दौऱ्यावर दमदार कामगिरी केली. इंग्लंडविरूद्ध झालेली मालिका २-२ ने बरोबरीत समाप्त झाली. दरम्यान आशिया चषकात पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्याआधी त्याने आपल्या आदर्श खेळाडूंची नावं सांगितली आहेत.
शुबमन गिलने अॅपल म्यूझिकच्या पॉडकास्टमध्ये बोलताना आपल्या आदर्श खेळाडूंची नावं सांगितली आहेत. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा शुबमन गिलचा पहिला आदर्श आहे. सचिन हा गिलच्या वडिलांचा देखील आवडता खेळाडू आहे. त्यानंतर त्याने विराट कोहलीचं नाव घेतलं. मॉडर्न क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या गिलने सचिन आणि विराटची आपला आदर्श म्हणून निवड केली आहे.
गिल म्हणाला,” मी दोघांना आदर्श मानतो, पहिला आदर्श सचिन तेंडुलकर. ते माझ्या वडिलांचे आवडते खेळाडू आहेत. त्यांच्यामुळेच मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली. २०१३ मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २०११- १३ या काळात मला क्रिकेट कळू लागलं.”
तसेच तो पुढे म्हणाला, “त्यावेळी मी विराट कोहलीला फॉलो करायला सुरूवात केली. ज्या पद्धतीने तो खेळतो, ते मला खूप आवडतं. कौशल्य आणि फलंदाजीतील तंत्र आपण शिकू शकतो. पण धावा करण्याची भूक ही अशी गोष्ट आहे जी सर्वांकडे नसते. विराटकडे या गोष्टीचा साठा आहे. हे मला खूप प्रेरणा देतं.”
गिलला घडवण्यात माजी भारतीय खेळाडू युवराज सिंगचा देखील मोलाचा वाटा आहे. गिल देशांर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळतो. युवराज देखील पंजाबकडून क्रिकेट खेळायचा. गिल अनेकदा युवराजकडून फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी सल्ले घेताना देखील दिसून आला आहे. दरम्यान गिलकडे कसोटी संघाची जबाबदारी सोपवणयात आली आहे. रोहितनंतर वनडे संघाचा कर्णधार म्हणूनही गिलच्या नावाची चर्चा रंगली आहे.