सलामीवीर रोहित शर्माची नुकतीच भारताच्या वनडे कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहितने विराट कोहलीची जागा घेतली असून त्याच्याकडे आता फक्त कसोटी संघाचे कर्णधारपद शिल्लक आहे. कसोटी आणि वनडेमध्ये कर्णधारपद कायम ठेवायचे आहे, असे सांगत कोहलीने टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. पण बीसीसीआयने त्याच्याकडून वनडेचे कर्णधारपदही काढून घेतले. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून रोहित भारतीय संघाचे एकदिवसीय कर्णधारपद सांभाळणार आहे. टीम इंडियाचा नवा कर्णधार म्हणून रोहितच्या नियुक्तीवर क्रिकेट जगतातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनंतर आता माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही रोहितला पाठिंबा दिला आहे.

गंभीरने स्टार स्पोर्ट्सला सांगितले, ”आता आपल्याकडे दोन कर्णधार आहेत, हे भारतीय क्रिकेटसाठी चांगले आहे. एक लाल बॉल क्रिकेटमध्ये आणि एक पांढर्‍या बॉल क्रिकेटमध्ये, त्यामुळे रोहितला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटसाठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल – मग ते टी-२० किंवा वनडे फॉरमॅट असो. मला वाटते की कर्णधार म्हणून रोहित शर्मा भारतीय क्रिकेटसाठी नक्कीच चांगली कामगिरी करेल. मला विश्वास आहे, की भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात आहे, विशेषतः मर्यादित प्रकाराच्या क्रिकेटमध्ये.”

हेही वाचा – किती ते कौतुक..! BCCIच्या ‘दादा’ला हिटमॅनची भूरळ; म्हणाला, ‘‘रोहित शर्मा एक महान कर्णधार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंभीर पुढे म्हणाला, ”रोहित इतर कर्णधारांच्या तुलनेत काहीतरी योग्य करत असेल. त्याने पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. तो इतर कर्णधारांच्या तुलनेत योग्य कामगिरी करत असावा. त्याच वेळी, त्याची शांतता आणि कधीकधी त्याची शांत वृत्ती देखील गोष्टींना आराम देते. तसेच खेळाडूंवर फारसे दडपण येत नाही. तो स्वतः एक अतिशय मनमिळावू व्यक्ती आहे, जो संपूर्ण टीमला खरोखर मदत करतो.”