गटातील अव्वल स्थान मिळवल्याने भारतीय महिला टेबल टेनिस संघाला जागतिक सांघिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळाले आहे.
शेवटच्या साखळी लढतीत महिला संघाने बलाढय़ बेल्जियमचे आव्हान ३-२ असे संपुष्टात आणले. गटातील पाचपैकी पाचही लढतीत विजय मिळवत भारतीय संघाने अव्वल स्थानावर कब्जा केला. मनिका बात्राने अनेलिआ कारोव्हावर ७-११, ११-४, १४-१२, ११-८ असा विजय मिळवला. सिबेल रेमझीने शामिनी कुमारेनसवर ११-९, ११-५, ६-११, ११-१३, ११-६ अशी मात केली. अंकिता दासने इव्हान्का अँजेलोव्हाला ११-६, ७-११, १४-१२, ११-८ असे नमवले. सिबेल रेमझीने मनिका बात्रावर ११-८, ११-८, ११-८ असा विजय मिळवला. शेवटच्या लढतीत शामिनी कुमारेसनने अनेलिआ कारोव्हाचा ११-५, ११-९, ११-७ असा पराभव केला.
दरम्यान पुरुष गटात जागतिक क्रमवारीत ३९व्या स्थानी असलेल्या शरथ कमालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पुरुष संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. इटलीविरुद्धच्या मुकाबल्यात झालेला पराभव पुरुष संघाला नुकसानदायी ठरला. शुक्रवारी त्यांची लढत इजिप्तशी होणार आहे. पुरुष संघाने पॅराग्वेचा ३-० असा धुव्वा उडवला. शरथ कमालने अलेजांड्रो टोरान्झोसवर ११-४, ११-८, ११-१ असा विजय मिळवला. अँथनी अमलराजने मार्केलो ऑग्युइरला ११-१, ११-६, ११-७ असे नमवले. सनील शेट्टीने अक्सेल गॅव्हिलनवर ११-३, ११-३, १३-११ अशी मात केली.