भारतीय महिला संघास चॅम्पियन्स चॅलेंज हॉकी स्पर्धेतील पहिल्याच साखळी सामन्यात दक्षिण कोरियाकडून पराभव स्वीकारावा लागला. हा सामना कोरियाने ४-२ असा जिंकला.
वंदना कटारिया हिने १२ व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले होते. मात्र लगेचच १४ व्या मिनिटाला कोरियाच्या मिहयुन पार्क हिने गोल करीत बरोबरी साधली. कोरियाने पुन्हा २४ व्या व २५ व्या मिनिटाला गोल करीत पूर्वार्धात ३-१ अशी आघाडी घेतली. कोरियाने ४२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारा आणखी एक गोल केला. ६९ व्या मिनिटाला पूनम राणी हिने भारताचा दुसरा गोल केला. मात्र त्यानंतर भारतास एकही गोल नोंदविता आला नाही. भारताची मंगळवारी स्कॉटलंडशी गाठ पडणार आहे.
पूनम राणी, चांचनदेवीचे अनोखे शतक
नवी दिल्ली : पूनम राणी व चांचनदेवी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शंभर सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची अनोखी कामगिरी केली आहे. पूनमने नुकत्याच झालेल्या आर्यलडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हे शतक पूर्ण केले. चांचन हिने स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेत दक्षिण कोरियाविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली.