Shubman Gill Jersey: रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम केल्यानंतर कर्णधारपदाची जागा रिकामी होती. ही जागा भरून काढण्याची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली. इंग्लंड दौऱ्यावर तो भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ ने बरोबरीत समाप्त केली. केवळ कर्णधार म्हणून नाही तर फलंदाज म्हणूनही गिल इंग्लंडमध्ये चमकला. चार शतकांसह तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मालिकेतील दहा डावात त्याने ७५४ धावा केल्या.
मैदानावर चमकणारा गिल मैदानाबाहेरही तुफान चर्चेत आहे. इंग्लंडमध्ये एका चॅरिटी ऑक्शनमध्ये गिलची जर्सी बोली लावण्यासाठी ठेवण्यात आली होती. ही जर्सी खरेदी करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली.
इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या चॅरिटी ऑक्शनमध्ये गिलसह, जसप्रीत बुमराह , रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि जो रूट यांची देखील जर्सी बोली लावण्यासाठी ठेवण्यात आली होती. पण सर्वाधिक भाव गिलच्या जर्सीने खाल्ला. गिलच्या जर्सीवर सर्वात मोठी बोली लागली. या जर्सीवर ५.४० लाखांची बोली लागली. ही तीच जर्सी आहे. तर जसप्रीत बुमराहच्या जर्सीवर ४.९४ लाख, रवींद्र जडेजाच्या जर्सीवर ४.९४ लाख, केएल राहुलच्या जर्सीवर ४.७१ लाख आणि जो रूटच्या जर्सीवर ४.७४ लाखांची बोली लागली.
या ऑक्शनमधून मिळणारी रक्कम ही रूथ अँड स्ट्रॉस फाउंडेशनला दिली जाणार आहे. या फाउंडेशनद्वारे गरजू आणि जीवघेण्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मदत केली जाते.
रेड फॉर रूथ डे नेमकं आहे तरी काय?
रेड फॉर रूथ डे हा लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर साजरा केला जातो. या दिवशी लॉर्ड्सच्या मैदानावर सर्व काही लाल असतं. सामना पाजण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनाही लाल रंगाचे कपडे घालून येण्यास सांगितलं जातं. इंग्लंडचा माजी खेळाडू अँड्र्यू स्ट्रॉसची पत्नी रूथ स्ट्रॉसचे कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यामुळे जनजागृती करण्याच्या उद्देशानेही हा दिवस लॉर्ड्सच्या मैदानावर साजरा केला जातो.