नोव्हेंबर-डिसेंबर हा गुलाबी थंडीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. यंदा या थंडीच्या जोडीला जगभरातल्या अव्वल टेनिसपटूंचा खेळ पाहण्याचे भाग्य भारतासह काही देशांतील टेनिसरसिकांना लाभणार आहे. टेनिसविश्वात लीग संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दोन टेनिस लीग वर्षांखेरीस अवतरणार आहेत. महेश भूपती निर्मित आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीगचा एक टप्पा राजधानी नवी दिल्लीत होणार आहे तर बाकीचे टप्पे फिलिपाइन्स, सिंगापूर आणि दुबईमध्ये रंगणार आहेत. विजय अमृतराज यांच्या चॅम्पियन्स टेनिस लीगचे सामने दिल्ली, पुणे, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, चंदिगढ या सहा ठिकाणी होणार आहेत. आधुनिक टेनिसचे मानकरी रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच यांच्यासह पीट सॅम्प्रस, आंद्रे आगासी या दिग्गजांचा खेळ ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्याची संधी टेनिसरसिकांना यानिमित्ताने मिळणार आहे.
प्रेक्षकांना आकृष्ट करण्यासाठी टेनिस लढतींचे स्वरूप बदलण्यात आले आहे. प्रत्येकी एका सेटच्या पाच लढती होणार आहेत आणि एकमेव सेट असल्याने प्रत्येक गेमसाठी एक गुण मिळणार आहे. सर्वाधिक गुणांची कमाई करणारा खेळाडू त्या लढतीचा विजेता असणार आहे. क्रिकेटपाठोपाठ हॉकी, बॅडमिंटन, कबड्डीमध्येही लीग स्पर्धा यशस्वी झाल्याने महेश भूपती आणि विजय अमृतराज यांनी टेनिसमध्ये लीग पर्वाची नांदी केली आहे. दिग्गजांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या खिशाला किती भरुदड पडणार, याबाबत मात्र संदिग्धता आहे. भूपतीनिर्मित लीगच्या दिल्लीतील तीनदिवसीय लढतींसाठी १२,००० ते १६,००० रुपये मोजावे लागणार असल्याची चर्चा होती. सर्वसामान्यांना परवडतील असे तिकिटाचे दर असतील, असे भूपतीने स्पष्ट केले आहे. अमृतराज यांच्या लीगमधील सामन्यांसाठी किती शुल्क असणार याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही.
खेळाच्या लोकप्रियतेला हातभार लावतानाच टेनिसपटूंना मालामाल करण्याचे उद्दिष्ट दोन्ही लीग निर्मितीकारांनी स्पष्ट केले असले तरी एका लीगमध्ये सहभागी टेनिसपटूंना दुसऱ्या लीगमध्ये खेळण्याची परवानगी नसल्याचे कलम भूपती आणि अमृतराज कंपूतील व्यावसायिक वैर अधोरेखित करणारे आहे. आतापर्यंत टेनिसचा सामना पाहणे टीव्हीपुरते मर्यादित होते. मात्र या लीगमुळे टेनिस सामने मैदानात जाऊन पाहण्याची दुर्मीळ संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onटेनिसTennis
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International tennis premier league
First published on: 17-10-2014 at 12:49 IST