पंजाबचा तडाखेबाज खेळाडू ख्रिस गेल हा गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जातो. सुरुवातीच्या षटकात गेलच्या फटकेबाजीची भल्याभल्या गोलंदाजांच्या मनात दहशत असते. पण दस्तुरखुद्द ख्रिस गेलच म्हणतो की गोलंदाजांनी मला घाबरण्याची किंवा माझ्या दहशतीत राहण्याची अजिबात गरज नाही. एका मुलाखतीमध्ये बोलताना गेलला त्याच्या फटकेबाज खेळाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

ख्रिस गेल म्हणाला की माझ्यासारख्या फलंदाजाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी ‘युनिव्हर्स बॉस’ असलो तरी मी एक सर्वसामान्य माणूसच आहे. इतर फलंदाजांपेक्षा मी थोडेसे लांब आणि मोठे षटकार मारतो. पण असे नेहमी होत नाही. काही वेळा मला षटकार मारण्यात यश मिळते तर काही वेळा मला षटकार खेचण्यात अपयश येते. गोलंदाजांने फक्त एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की मला बाद करण्यासाठी केवळ १ चांगला चेंडू टाकणे आवश्यक असते. त्यामुळे माझी दहशत वाटून घेऊ नका.

विश्वचषकाच्या संघातील स्थानाबाबत बोलताना तो म्हणाला की विश्वचषक स्पर्धा ही मोठी गोष्ट असते. प्रत्येक संघाला आपल्या देशातील खेळाडूंना जागतिक स्तरावर खेळताना पाहून आनंद होत असतो. त्यामुळे चाहत्यांचा अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही सर्वजण संघ म्हणून नक्कीच प्रयत्न करू, असेही गेल म्हणाला.

दरम्यान, किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा सलामीचा फलंदाज ख्रिस गेल याने यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली. घरच्या मैदानावर खेळत असताना ३० मार्चच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध ख्रिस गेलने आयपीएल मध्ये ३०० व्या षटकाराची नोंद केली. महत्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलमध्ये एकाही फलंदाजाच्या नावावर २०० षटकारही नोंदवले गेलेले नाहीयेत. एबी डिव्हीलियर्सच्या नावावर सध्या १९३ षटकार जमा आहेत. त्यामुळे या शर्यतीत ख्रिस गेल इतरांच्या भरपूर पुढे आहे.