भारताच्या महिला संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना IPL 2019 मध्ये सट्टा लावताना अटक करण्यात आली आहे. बडोदा पोलीसांनी आरोठे यांच्यासह एकूण १८ लोकांना अटक केली आहे. एका कॅफेमध्ये बसून हे सर्व जण सट्टा खेळत होते. त्यावेळी बडोदा पोलिसांनी धाड टाकून त्यांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून काही मोबाईल आणि गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

तुषार आरोठे यांनी भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपद भुषवले होते. महिला संघाचे प्रशिक्षक असताना आरोठे आणि खेळाडूंमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. काही महिला खेळाडूंनी आरोठेंविरोधात BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तुषार आरोठे हे बडोदा संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू होते. पण महिला संघाचे प्रशिक्षकपद भुषवताना संघातील खेळाडू त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत्या. त्यामुळे BCCI ने आरोठे यांना राजीनामा द्यायला लावला होता. तुषार आरोठेने वादग्रस्त पद्धतीने प्रशिक्षकपद सोडल्यानंतर दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेले पोवार यांना या संघाचे प्रभारी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.