IPL 2019 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई संघाला अखेर बुधवारी मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर ३७ धावांनी धूळ चारली. जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने केलेल्या माऱ्याच्या जोरावर मुंबईने हा विजय संपादन केला. मुंबईने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ ८ गड्यांच्या मोबदल्यात १३३ धावांपर्यंत मजल मारु शकला. चेन्नईकडून मराठमोळ्या केदार जाधवने ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली, मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ मिळू शकली नाही.

कृणाल पांड्या सामन्यातील १३ वे षटक टाकत होता. १३ व्या षटकातील ४ चेंडू टाकून झाले होते. चेन्नईचा कर्णधार महेंदसिंग धोनी आणि केदार जाधव मैदानावर होते. कृणाल पांड्या केदार जाधवला षटकातील पाचवा चेंडू टाकणार, तेवढ्यात धोनी नॉन स्ट्राईकवर क्रीजच्या बाहेर आल्याचे त्याला जाणवले. हे पाहतच त्याने चेंडू टाकणे थांबवत धोनीला ‘मकडिंग’ ची हूल दिली. त्याने दिलेली हूल पाहून धोनी तर झटकन क्रीजच्या आत आलाच, पण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरदेखील एकच जल्लोष पाहायला मिळाला. राजस्थान विरुद्ध पंजाब या सामन्यात अश्विनने मंकडिंग करत बटलरला बाद केले होते. तर कृणाल पांड्यानेच पंजाबच्या मयंक अग्रवालला मकडिंगची हूल दिली होती.

 

 

दरम्यान, बुधवारच्या सामन्यात मुंबईने संघात संधी दिलेल्या जेसन बेहरनडॉर्फने पहिल्याच षटकात चेन्नईला धक्का दिला. अंबाती रायुडूला माघारी धाडत बेहरनडॉर्फने पहिला बळी घेतला. यानंतर शेन वॉटसन आणि सुरेश रैनाही ठराविक अंतराने माघारी परतले. केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र धोनी माघारी परतल्यानंतर चेन्नईच्या डावाला पुन्हा गळती लागली. अखेरीस ५८ धावांवर जाधवही माघारी परतला. यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजांनी फारसे हात मोकळे करण्याची संधी दिली नाही. मुंबईकडून गोलंदाजांसोबत क्षेत्ररक्षकांनीही चांगली कामगिरी बजावली. पोलार्ड आणि यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉक यांनी सामन्यात काही चांगले झेल पकडले. मुंबईकडून लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने ३-३ बळी घेतले. त्यांना बेहरनडॉर्फने २ बळी घेत चांगली साथ दिली.

त्याआधी, सूर्यकुमार यादवचं अर्धशतक आणि त्याला कृणाल पांड्याने दिलेली साथ या जोरावर, घरच्या मैदानावर खेळत असताना मुंबई इंडियन्सने १७० धावांपर्यंत मजल मारली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर क्विंटन डी-कॉक, कर्णधार रोहित शर्मा आणि युवराज सिंह हे ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि कृणाल पांड्या जोडीने मुंबईचा डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे मुंबईच्या संघाने आश्वासक धावसंख्याही गाठली. कृणाल पांड्याला बाद करत मोहीत शर्माने मुंबईची जोडी फोडली. मात्र दुसऱ्या बाजूने सूर्यकुमारने आपला खेळ सुरु ठेवत अर्धशतक झळकावलं. त्याने ४३ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

सूर्यकुमार अखेरच्या षटकांमध्ये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ब्राव्होच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी अखेरच्या दोन षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला १७० धावांचा टप्पा गाठून दिला. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांनी १-१ बळी घेतला.