IPL 2019 RCB vs KXIP : एबी डिव्हीलियर्सचं आक्रमक नाबाद अर्धशतक (८२*) व त्याला पार्थिव पटेल (४३) आणि मार्कस स्टॉयनिस (४६*) ने दिलेली साथ या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २०२ धावांपर्यंत मजल मारली. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम बंगळुरुला फलंदाजीचा संधी दिली. आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत पंजाबच्या गोलंदाजांनी बंगळुरुच्या डावाला सुरुवातीच्या षटकांमध्ये खिंडार पाडलं होतं. पण डीव्हिलियर्स – स्टॉयनीस जोडीने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले.
संघ संकटात सापडलेला असताना एबी डिव्हीलियर्सने एका बाजूने आक्रमक खेळी करत संघाचा डाव सावरला. अखेरच्या षटकांमध्ये पंजाबच्या गोलंदाजांवर त्यांनी हल्ला चढवला आणि डिव्हीलियर्सने आपलं अर्धशतक साजरं केलं. या फटकेबाजीमुळे संकटात सापडलेला बंगळुरुचा संघ चांगलाच स्थिरावला. डिव्हीलियर्स आणि स्टॉयनिस यांच्यात पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली.
Partnership at the end?
121(66)! They came in when we were reeling at 81-4 after a good spell of spin.
Slow start, but it’s how you finish that matters. And that finish was #PlayBold #RCBvKXIP #VIVOIPL2019 pic.twitter.com/BhqnfBt2xn
— Royal Challengers (@RCBTweets) April 24, 2019
१८ षटकांचा खेळ संपला त्यावेळी बंगळुरूची धावसंख्या ४ बाद १५४ होती. पण त्यानंतर मात्र या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. मोहम्मद शमीच्या षटकात या जोडीने तब्बल २१ धावा कुटल्या, तर शेवटच्या षटकात या जोडीने विल्जोएनला २७ धावा ठोकल्या. शेवटच्या २ षटकात या जोडीने तब्बल ४८ धावांची भर घातली. या शेवटच्या २ षटकात या दोन फलंदाजांनी मिळून एकूण २ चौकार आणि तब्बल ६ षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे बंगळुरूला द्विशतकी मजल मारता आली.
त्याआधी, पहिल्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी झाल्यानंतर विराट कोहली (१३) मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. यानंतर पार्थिव पटेल आणि एबी डिव्हीलियर्स यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. पार्थिवने या दरम्यान फटकेबाजी करत काही चांगले फटके खेळले. मात्र मुरगन आश्विनच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. पार्थिवने ४३ धावा केल्या. यानंतर मोईन अली (४) आणि अक्षदीप नाथ (३) ही झटपट माघारी परतले. पंजाबकडून अंकित राजपूतचा अपवाद वगळता चारही गोलंदाजांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला.