आयपीएलच्या बाराव्या हंगामात, मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाची नोंद केली. चिन्नास्वामी मैदानावर मुंबईने बंगळुरुवर ६ धावांनी मात केली. शेवटच्या चेंडूवर पंचांनी केलेल्या ढिसाळ कामगिरीचा फटका बंगळुरुला बसला. लसिथ मलिंगाने टाकलेला नो-बॉल पंचांच्या नजरेत पडला नाही, आणि मुंबईने सामन्यात बाजी मारली. बंगळुरुकडून एबी डिव्हीलियर्सने आक्रमक अर्धशतक झळकावत चांगली झुंज दिली.

डिव्हीलियर्सने ४१ चेंडूत ७० धावा ठोकल्या. या खेळीत ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान एबी डिव्हीलियर्सने आयपीएलमध्ये ४ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा परदेशी खेळाडू ठरला आहे.

याचवेळी आयपीएलमधघ्ये एबी डिव्हीलियर्सच्या नावावर असलेली एक परंपरा आज खंडीत झाली. आयपीएलमध्ये एबी डिव्हीलियर्सच्या नाबाद खेळीदरम्यान धावांचा पाठलाग करताना एखादा संघ पहिल्यांदा पराभूत झाला आहे. याआधी १५ वेळेला डिव्हीलियर्सच्या नाबाद खेळीमुळे संघाने विजय प्राप्त केला आहे.

मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, एबी डिव्हीलियर्सने फटकेबाजी करत मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र जसप्रीत बुमराहने 19 व्या षटकात भेदक मारा करत बंगळुरुचं आव्हान आणखी खडतर केलं. यानंतर अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या 18 धावा पूर्ण करत बंगळुरुला जमलं नाही.