IPL 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अगदी शेवटच्या चेंडूवर ६ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मलिंगाने टाकलेला सामन्यातील शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेनंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने थेट सामानाधिकाऱ्यांच्या रूममध्ये जाऊन धुडगूस घातला आणि शिवीगाळ केला.

शेवटच्या चेंडूवर ७ धावा हव्या असताना बंगळुरूला केवळ १ धावेवर समाधान मानावे लागले. त्यानंतर मुंबईचे खेळाडू मैदानातच जल्लोष करू लागल्याने पंचांकडून नो बॉल चा निर्णय न देण्याचा हलगर्जीपणा घडला. याबाबत टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार या मुद्द्यावरून संतापलेला विराट कोहली थेट सामनाधिकाऱ्यांच्या रूममध्ये गेला आणि त्याने तेथे जाऊन शिवीगाळ केली आणि आक्षेपार्ह शब्द वापरले. याशिवाय, ‘मला माझ्या या वर्तनाबाबत दंड किंवा शासन करण्यात आले तरी मला त्याबद्दल काहीही फरक पडत नाही’, असे विधानही कोहलीने केल्याचे सांगण्यात येत आहे.

या ‘नो बॉल’ नाट्यावरून विराटने आपली नाराजी सामन्यानंतरच्या मुलाखतीतही व्यक्त केली होती. तसेच सामना संपल्यानंतर घडलेल्या प्रकारावरून तो संतापला असल्याचे मोठ्या स्क्रीनवरदेखील दाखवण्यात आले होते. विराटच्या या वर्तणुकीमुळे ‘फेअर-प्ले’ पुरस्काराच्या यादीत बंगळुरूचे काही गुण कमी होतील तसेच तसेच विराटवर कारवाई करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सामना संपल्यानंतर विराटने मुलाखतीत या प्रकरणात आपला राग व्यक्त केला. ‘IPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो. हा आयपीएलचा सामना होता एखाद्या क्लब क्रिकेटचा नाही. पंचांनी मैदानात डोळे उघडे ठेवून उभं राहणे अपेक्षित आहे. शेवटच्या चेंडूवर पंचाचा निर्णय मूर्खपणाचा होता. इथे थोड्याश्या फरकाने समान्याच्या निकालावर फरक पडतो. इथे काय सुरु आहे मला अंदाजच येत नाहीय. पण पंचांनी मैदानावर जास्त सजग राहिले पाहिजे. अशा अटीतटींच्या समान्यांमध्ये पंचांनी जास्त काळजी घ्यायला हवी.’