मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्यात, अखेरच्या षटकात पंचांकडून झालेल्या गोंधळामुळे बंगळुरुला सामना गमवावा लागला. मुंबई इंडियन्सने सामन्यात ६ धावांनी बाजी मारत, स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. मात्र मलिंगाने टाकलेला नो-बॉल न पाहणं ही सर्वस्वी पंच एस.रवी यांची चूक असल्याचं समोर येतंय. Star Sports वाहिनीच्या एका अधिकाऱ्या IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.
“सामना संपल्यानंतर मी कॅमेऱ्यामध्ये फिड तपासत होतो. यावेळी पंच रवी हे मलिंगाच्या पायाकडे पाहतही नव्हते. त्यांचं पूर्ण लक्ष हे फलंदाजाच्या दिशेने होतं.” Star Sports च्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. याविषयी बोलत असताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सध्या सर्वच भारतीय पंच हे फलंदाज बाद झाल्यानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून नो-बॉल तपासत असल्याचं सांगितलं.
गोलंदाज चेंडू टाकत असताना, सर्वप्रथम त्याच्या पायाकडे लक्ष देणं, यानंतर तो चेंडू कसा टाकतोय हे पाहणं आणि नंतर फलंदाजाकडे पाहणं, हा पायंडा सध्याच्या भारतीय पंचांनी मोडलेला आहे. त्यांचं लक्ष हे चेंडूचा टप्पा कुठे पडतोय याकडे असतं. जर फलंदाज बाद झाला तर खबरदारीचा उपाय म्हणून ते तिसऱ्या पंचांच्या मदतीने नो-बॉल तपासतात. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही आपली नाराजी व्यक्त केली.
या घटनेची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली असून, पंचांच्या कामगिरीची तपासणी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या घटनेत दोषी असलेल्या पंचावर कारवाई करण्यात येईल. याचसोबत आगामी सामन्यांमध्ये एस. रवी यांना पंच म्हणून हजर राहण्याची परवानगी नाकारली जाऊ शकते, असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.
