IPL 2019 RCB vs RR : बंगळुरूच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना गुणतालिकेतील तळाच्या दोन संघांमध्ये असल्याने दोनही संघांना प्ले ऑफ्स फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने या सामन्यात विजय आवश्यक आहे. पण या दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने सामना सुरु होण्यास विलंब झाला.

विराट कोहलीच्या संघाला हा आणि यापुढचा दिल्लीविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. त्याबरोबरच त्यांना इतर सामन्यांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे. इतर सामन्यात बंगळुरूला हवे असल्याप्रमाणे निकाल लागले आणि बंगळुरूला नशिबाची साथ लाभली, तर अजूनही त्यांना प्ले ऑफ्स फेरी गाठता येऊ शकते. पण सध्याच्या कामगिरीवरून विराट आणि कंपनी यांना नशीब कितपत साथ देईल याबाबत शंकाच आहे.

याचे कारण विराट कोहलीच्या नशिबाने यंदाच्या IPL मध्ये त्याला नाणेफेकीत अतिशय कमी साथ दिली आहे. यंदाच्या IPL मध्ये बंगळुरूच्या संघाचा हा १३ वा सामना आहे. पण एकूण १३ सामन्यांपैकी १० सामन्यात विराटला नाणेफेक जिंकता आलेली नाही. मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद या ३ संघांविरुद्ध विराटने प्रत्येकी एकदा नाणेफेक जिकली. पण इतर संघाविरुद्ध त्याला नाणेफेक जिकता आली नाही.

दरम्यान, सध्या बंगळुरूच्या संघ गुणतालिकेत शेवटच्या म्हणजेच आठव्या स्थानी आहे. विराट कोहलीच्या संघाला पुढचे दोन सामने जिंकणे क्रमप्राप्त आहे. त्यातही विशेष म्हणजे राजस्थानविरूद्ध आणि दिल्लीविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा विजय आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला बाद फेरी गाठायची असेल तर त्यांना इतर उर्वरित सामन्यांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे.