IPL 2019 KXIP vs DC – डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करन याने मिळवलेल्या हॅटट्रिकच्या बळावर पंजाबने दिल्लीवर १४ धावांनी विजय मिळवला. पंजाबने २० षटकात दिल्लीपुढे १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण हे आव्हान त्यांना पेलता आले नाही. दिल्लीचा डाव १५२ धावांत आटोपला. करनने १४ चेंडूत ११ धावा देऊन ४ बळी टिपले. त्यालाच सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
Sam Curran is adjudged the Man of the Match for his brilliant hat-trick and bowling figures of 4/11 pic.twitter.com/BIAXuSLcNL
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2019
सॅम करन हा IPL च्या इतिहासात हॅटट्रिक घेणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला. त्याने हर्षल पटेल, संदीप लामीचन्ने आणि कागिसो रबाडा या तिघांना बाद करत हॅटट्रिक पटकावली. त्याने प्रथम हर्षल पटेलला १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. हर्षद पटेल २ चेंडूत शून्य धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकात त्याने पहिल्या चेंडूवर रबाडाला आणि दुसऱ्या चेंडूवर लामीचन्ने याला त्रिफळाचीत केले. याबरोबरच त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला. २००९ साली रोहितने वयाच्या २२व्या वर्षी (२२ वर्षे आणि ६दिवस) हॅटट्रिक घेतली होती. तो आतापर्यंत सर्वात तरुण हॅटट्रिकवीर होता. त्याचा विक्रम २० वर्षीय (२० वर्षे आणि ३०२ दिवस) सॅम करनने मोडला.
First HATTRICK of #VIVOIPL 2019 @CurranSM
What a comeback this from @lionsdenkxipin as they win by 14 runs in Mohali. pic.twitter.com/cSnOG9o9z4
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2019
दरम्यान, पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गेल्या सामन्यात धडाकेबाज ९९ धावांची खेळी करणारा पृथ्वी शॉ या सामन्यात शून्यावर बाद झाला. दिल्लीच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर त्याला अश्विनने झेलबाद केले. पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला आणि सातव्या षटकात दिल्लीला अर्धशतकी मजल मारून दिली. खेळपट्टीवर स्थिरावलेला दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर त्रिफळाचीत झाला. बॅटच्या कडेला लागून चेंडू स्टंपवर आदळला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. श्रेयसने २२ चेंडूत ५ चौकारांसह २८ धावा केल्या. काही वेळातच धवनदेखील बाद झाला. अश्विनने त्याला पायचीत केले. धवनने २५ चेंडूत ३० धावा केल्या. त्यानंतर पंत आणि इन्ग्रॅम यांनी डाव सावरला. पण थोड्या वेळात जमलेली जोडी फुटली आणि ऋषभ पंत त्रिफळाचीत झाला. पंतने २६ चेंडूत ३९ धावा केल्या. पंत बाद झाल्यामुळे पंजाबचे सामन्यात कमबॅक झाले. त्यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली. पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मॉरिस बाद झाला. पंजाबच्या अप्रितम क्षेत्ररक्षणामुळे मॉरिस धावचीत झाला. डावाला गती देणारा कॉलिन इन्ग्रॅमही सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याने २९ चेंडूत ३८ धावा केल्या. त्यात ४ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. त्यापाठोपाठ हर्षद पटेल त्रिफळाचीत झाला. त्यामुळे दिल्लीच्या अडचणीत वाढ झाली. इंग्लंड दौऱ्यात आपली चमक दाखवलेला हनुमा विहारी या सामन्यात ‘फेल’ ठरला. तो केवळ २ धावा करून माघारी परतला. गेल्या सामन्यात सुपर ओव्हर फेकणारा रबाडा त्रिफळाचीत झाला. त्याच्यासाठी पहिलाच चेंडू सामन्यातील शेवटचा चेंडू ठरला. नेपाळचा संदीप लामीचन्ने याचा त्रिफळा उडवत करनने आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि पंजाबला १४ धावांनी विजय मिळवून दिला.
Sam Curran, you beauty #VIVOIPL pic.twitter.com/3ls47GBt0t
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2019
त्याआधी, ११ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार लगावत धडाकेबाज सुरुवात करणारा लोकेश राहुल झेलबाद झाला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. त्याने १५ धावा केल्या. पंजाबच्या संघाने ख्रिस गेलच्या जागी सॅम करन याला सलामीला फलंदाजीसाठी पाठवण्याचा प्रयोग केला होता. मात्र हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही. तो १० चेंडूत २० धावा करून पायचीत झाला. त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचले, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईविरुद्धच्या सामन्यात चांगली खेळी करणारा मयंक अग्रवाल य सामन्यात ६ धावांवर बाद झाला. सर्फराझ खानशी झालेल्या गोंधळामुळे तो धावबाद झाला आणि पंजाबचा तिसरा गडी माघारी परतला. खेळपट्टीवर स्थिरावलेला सर्फराझ खान संदीप लामीचन्नेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि पंजाबला चौथा धक्का बसला. त्याने २९ चेंडूत ६ चौकरांसह ३९ धावा केल्या. शेवटची काही षटके शिल्लक राहिली असताना फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात डेव्हिड मिलर झेलबाद झाला. मॉरिसच्या गोलंदाजीवर उंच उडालेला चेंडू ऋषभ पंतने झेलला आणि पंजाबला पाचवा झटका बसला. त्यानंतर मात्र झटपट गडी बाद झाले.
फलंदाजीसाठी फारसा प्रचलित नसलेला हार्डस विल्जोएन केवळ १ धाव करून माघारी परतला आणि पंजाबला सहावा धक्का बसला. पाठोपाठ कर्णधार अश्विन त्रिफळाचीत झाला तर मुरुगन अश्विन झेलबाद झाला. रविचंद्रन अश्विनने ३ धावा केल्या, तर मुरुगन अश्विनला केवळ १ धाव जमवता आली. झटपट धावा जमवण्यासाठी चोरटी धाव घेताना मोहम्मद शमी पायचीत झाला. त्याने भोपळाही फोडला नाही. मनदीप सिंगने मात्र २१ चेंडूत नाबाद २९ धावांची उपयुक्त खेळी केली. यात २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
