IPL सामन्यात चेन्नईचा संघ एखाद्या संघाविरुद्ध खेळणार असेल आणि धोनी नाणेफेकीसाठी आलाच नाही तर…. असा प्रकार फारच विरळा बघायला मिळतो. तसाच प्रकार आजच्या सामन्यात बघायला मिळाला. सामना सुरु होण्याआधी नाणेफेकीची वेळ झाली आणि हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याच्यासोबत चेन्नईचा कर्णधार म्हणून सुरेश रैना आला…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणेफेकीसाठी मैदानावर धोनीऐवजी रैना येणे हा प्रकार पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण ही बाब फारशी परिचयाची नाही. अशा प्रकारचा अनुभव शेवटचा कधी बरे आला असेल? याबाबत चाहत्यांनीदेखील चर्चा केली असेल. या आधी धोनीने IPL चा सामना खेळला नाही अशी बाब तब्बल ९ वर्षानंतर घडली. २०१० साली धोनीशिवाय CSK चा संघ शेवटचा मैदानावर उतरला होता. मात्र त्यानंतर आजच्या सामन्यापर्यंत धोनी एकही सामन्याला मुकला नव्हता. धोनीने CSK साठी सलग तब्बल १२१ सामने खेळले. त्यांनतर त्याने आज विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.

नाणेफेकीसाठी मैदानावर आलेला सुरेश रैना याने धोनीबाबत बोलताना सांगितले की महेंद्रसिंग धोनीने या सामन्यासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. पुढच्या सामन्यात तो संघात परतणार आहे.

दरम्यान, गेल्या सामन्यात सुरेश रैनाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपली विजयी परंपरा कायम राखली. इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर ५ गडी राखून मात केली. १६२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली होती. मात्र सुरेश रैनाने मैदानात तळ ठोकून संघाला विजय मिळवून दिला.

कोलकात्याच्या गोलंदाजांनी आजच्या डावाची चांगली सुरुवात केली. सलामीवीर शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू आणि केदार जाधव हे फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर रैना आणि धोनी जोडीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. धोनीला माघारी धाडत कोलकात्याने चेन्नईची जमलेली जोडी फोडली खरी, मात्र रैनाने रविंद्र जाडेजाच्या साथीने संघाची अधिक पडझड होऊ न देता विजय मिळवला.

कोलकात्याकडून पियुष चावला, सुनील नरीन जोडीने प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्याला हॅरी गुर्नीने एक बळी घेत चांगली साथ दिली. मात्र चेन्नईच्या फलंदाजीवर पूर्णपणे अंकुश लावणं त्यांना जमलं नाही. त्याआधी, कोलकात्याने ८ बाद १६१ धावा केल्या. ख्रिस लिनच्या ८२ धावांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर कोलकाताने चेन्नईला विजयासाठी १६२ धावांचे आव्हान दिले.

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि कोलकाताला फलंदाजीस आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना संघात पुनरागमन केलेल्या सुनील नरिनला फलंदाजीत फार मोठी कामगिरी करता आली नाही. तो झेलबाद झाला आणि कोलकाताला पहिला धक्का बसला. त्याने केवळ २ धावा केल्या. पुनरागमनात नरिन अपयशी ठरला असला, तरी ख्रिस लिनने आपली छाप पाडली. त्याने ३६ चेंडूत दमदार अर्धशतक साजरे केले. शांत आणि संयमी खेळीने सुरुवात करणारा नितीश राणा उंच फटका मारून झेलबाद झाला. त्याने १८ चेंडूत २१ धावा केल्या. अनुभवी रॉबिन उथप्पाने पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळला, पण डु प्लेसिसचा त्याचा अफलातून झेल टिपला. त्यामुळे उथप्पाला शून्यावर माघारी परतावे लागले.

दमदार फटकेबाजी करणारा सलामीवीर ख्रिस लिन ८२ धावांवर बाद झाला. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने ५१ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकार खेचत ८२ धावा केल्या. धोकादायक फटकेबाजी करणारा आंद्रे रसल या सामन्यात स्वस्तात बाद झाला. १ चौकार आणि १ षटकार खेचत त्याने फटकेबाजीला सुरुवात केली होती. पण त्याला फार काळ खेळपट्टीवर तग धरता आले नाही. तो ४ चेंडूत १० धावा करून माघारी परतला. कर्णधार दिनेश कार्तिककडून जबाबदारीने खेळी करण्याची अपेक्षा चाहत्यांना होती, पण त्याने बेजबाबदार फटका लगावला आणि कोलकाताला सहावा धक्का बसला. त्याने १४ चेंडूत १८ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 srh vs csk ms dhoni misses out ipl game first time after
First published on: 17-04-2019 at 20:57 IST