आयपीएल २०२१ स्पर्धेतील अतितटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं कोलकात्याला २ गडी राखून नमवलं. कोलकात्याने ७ गडी गमवून विजयासाठी १७२ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान चेन्नईनं ८ गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह चेन्नईचा संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला. शेवटच्या षटकात आक्रमक खेळी करत रविंद्र जडेजाने संघाला विजय मिळवून दिला. जडेजाने ८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २२ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेन्नईचा डाव

कोलकात्यानं दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस जोडी मैदानात उतरली. या जोडीनं संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. संघाची धावसंख्या ७४ असताना चेन्नईला ऋतुराज गायकवाडच्या रुपाने पहिला धक्का बसला. ऋतुराज २८ चेंडूत ४० धावा करून तंबूत परतला. या खेळीत २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. त्यानंतरही फाफनं आपला आक्रमक बाणा कायम ठेवला. फाफला मोइन अलीची साथ मिळाली. संघाची धावसंख्या १०२ असताना डुप्लेसिस बाद झाला. त्याने ३० चेंडूत ४३ धावा केल्या. या खेळीत ७ चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर मैदानात आलेला अंबाती रायडू खेळपट्टीवर जास्त वेळ तग धरू शकला नाही. सुनील नरेननं त्याचा त्रिफळा उडवला. ९ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने त्याने १० धावा केल्या. मोइन अली बाद झाल्याने चेन्नईला चौथा धक्का बसला. मोइननं २८ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. यात २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर उंच फटका मारला होता. मात्र सीमेवर वेंकटेश अय्यरनं झेल घेऊन तंबूचा रस्ता दाखवला. मोइन अलीनंतर लगेचच सुरेश रैना २ धावा घेण्याच्या नादात बाद झाला. सुरेश रैनाच्या मागोमाग धोनीही त्रिफळाचीत झाला. वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवींद्र जडेजाने आक्रमक खेळी करत विजयापर्यंत आणलं. मात्र सॅम करन बाद झाल्याने संघावरील दडपण वाढलं. त्यानंतर शार्दुल ठाकुर तीन धावा करत जडेजाला स्ट्राईक दिली. ३ चेंडूत १ धावा हवी असताना पहिला चेंडू हुकला. त्यानंतरच्या चेंडूवर जडेजा बाद झाला. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली. मात्र शेवटच्या चेंडूवर दीपक चाहरने फटका मारत संघाला विजय मिळवून दिला.

कोलकात्याचा डाव

कोलकात्याला शुबमन गिलच्या रुपाने पहिला धक्का बसला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला. अंबाती रायडूने जबरदस्त क्षेत्ररक्षण करत त्याला धावचीत केलं. शुबमन गिलने ५ चेंडूत ९ धावा केल्या. यात २ चौकारांचा समावेश आहे. शुबमन गिलनंतर वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी संघाचा डाव सावरला. मात्र संघाची धावसंख्या ५० असताना वेंकटेश अय्यर बाद झाला. त्याने १५ चेंडूत १८ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश आहे. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने त्याचा झेल घेतला. कर्णधार इऑन मॉर्गनही खेळपट्टीवर जास्त वेळ तग धरू शकला नाही. १४ चेंडूत ८ धावा करून तंबूत परतला. जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर उंच फटका मारला. हा चेंडू सीमापलीकडे जाईल असा अंदाज होता. मात्र फाफ डुप्लेसिसनं सीमेवर अप्रतिम झेल पकडला आणि मॉर्गनला तंबूचा रस्ता दाखवला. कर्णधार मॉर्गननंतर राहुल त्रिपाठीही तंबूत परतला. त्याने ३३ चेंडूत ४५ धावा केल्या. रविंद्र जडेजाने त्याचा त्रिफळा उडवला. आंद्रे रसेलच्या रुपाने कोलकात्याला पाचवा धक्का बसला. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर फटका मारताना चेंडू निसटला आणि त्रिफला उडाला. रसेलने १५ चेंडूत २० धावा केल्या. यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि नितीश राणा या जोडीनं मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आक्रमक खेळी केली. दिनेश कार्तिक ११ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. या खेळीत ३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे.

चेन्नई आणि कोलकाता दरम्यान आतापर्यंत २४ सामने झाले आहेत. त्यापैकी १६ सामन्यात चेन्नईने, तर ८ सामन्यात कोलकात्याने विजय मिळवला आहे. अबुधाबीत या दोन्ही संघात एक सामना खेळला गेला होता. यात कोलकात्याने बाजी मारली होती. चेन्नई सुपर किंग्स संघात एक बदल करण्यात आला होता. सॅम करेनला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर कोलकात्याच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

चेन्नई- एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोइन अली, रविंद्र जडेजा, सॅम करेन, फाफ डुप्लेसिस, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, जोश हेजलवूड

कोलकाता- इऑन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरेन, लॉकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 chennai super kings vs kolkata knight riders update 26 sep 2021 rmt
First published on: 26-09-2021 at 15:02 IST