आयपीएल २०२१ स्पर्धेत दिल्ली संघातून खेळण्याऱ्या शिखर धवननं आपल्या नावावर ऑरेंज कॅप केली आहे. काही तास बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेलच्या डोक्यावर मानाची कॅप राहिली. मात्र पंजाबविरुद्ध शिखर धवनने चांगली कामगिरी करत ऑरेंज कॅपचा मान पटकावला आहे. शिखर धवननं चांगली फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. यापूर्वी शिखरने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात ५४ चेंडूत ८५ धावांची खेळी केली होती. त्यात १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. मात्र धवनची बॅट राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चालली नाही. त्याने ११ चेंडूत केवळ ९ धावा केल्या आणि तंबूत परतला. जयदेव उनाडकडन त्याला बाद केलं. मात्र पंजाबविरुद्धच्या सामन्यात धवननं आक्रमक खेळी केली. त्याने ४९ चेंडूत ९२ धावा केल्या. त्यात १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. ग्लेन मॅक्सवेलला अवघ्या काही तासांसाठी ऑरेंज कॅपचं सुख घेता आलं. तिन्ही सामन्यात मिळून त्याच्या १८६ धावा आहेत.

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गोलंदाज हर्षल पटेलला पर्पल कॅपचा मान मिळाला. त्याने आतापर्यंतच्या तीन सामन्यात एकूण ९ गडी बाद केले आहेत. हर्षल पटेलनं मुंबई विरुद्धच्या सामन्यात ४ षटकं टाकली. त्यात २७ धावा देत त्याने ५ गडी बाद केले. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातही कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर विश्वास कायम ठेवत ४ षटकं दिली. त्यात त्याने २५ धावा देत २ गडी बाद केले. कोलकाता विरुद्धच्या सामन्यातही त्याने चांगली कामगिरी केली. ४ षटकात १७ धावा देत २ गडी बाद केले. या तिन्ही सामन्यात त्याने एकूण ९ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला पर्पल कॅप देऊन सन्मानित करण्यात आलं.

कोलकात्यावरील विजयानंतर बंगळुरुचा संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. बंगळुरुने सलग तीन सामने जिंकले आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला, दूसऱ्या सामन्यात हैदराबाद, तर तिसऱ्या सामन्यात कोलकात्याला पराभूत केलं आहे. बंगळुरुचा पुढचा सामना राजस्थानसोबत २२ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.