कोलकात्यानं मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. मुंबईनं कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान कोलकात्यानं ३ गडी गमवून १६ व्या षटकात पूर्ण केलं. वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे हा विजय सोपा झाला. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमरानं ३ गडी बाद केले. या पराभवानंतर मुंबई संघाची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर कोलकात्याचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला. मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग या पराभवामुळे खडतर झाला आहे. गुणतालिकेत दिल्ली पहिल्या स्थानी, चेन्नई दुसऱ्या स्थानी, बंगळुरु तिसऱ्या स्थानी, तर कोलकाता चौथ्या स्थानी आहे. राजस्थाननं पंजाबला पराभूत केल्यानं पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तर आजच्या पराभवाचा फटका मुंबईला बसला असून पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

कोलकात्याचा डाव

कोलकाता संघानं मुंबईनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आक्रमक खेळी केली. शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यर या जोडीनं चांगली सुरुवात केली. शुबमन गिल १३ धावा करून बाद झाला. त्याने एक षटकार आणि एक चौकार मारला. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी राहुल त्रिपाठी आणि वेंकटेश अय्यरने अर्धशतकी भागीदारी केली. कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरने विस्फोटक फलंदाजी करत २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. या खेळीत ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश आहे. ५३ धावांवर असताना बुमराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. अय्यरनंतर राहुल त्रिपाठीने अर्धशतक झळकावलं. त्रिपाठीने ४२ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. कोलकात्याचा कर्णधार इऑन मॉर्गनला साजेशी खेळी करता आली नाही. तो ७ करून बाद झाला.

मुंबईचा डाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईनं कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबई विरुद्धच्या सामन्यात कोलकात्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानंतर फलंदाजीसाठी आघाडीला आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि डिकॉकने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. रोहित शर्माने ३० चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. तर डिकॉकने अर्धशतकी खेळी केली. डिकॉकने ४२ चेंडूत ५५ धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाज साजेशी कामगिरी करू शकले नाही. मोठे फटके मारताना एका मागोमाग एक बाद झाले. सुर्यकुमार ५ धावा, इशान किशन १४ धावा, पोलार्ड २१ धावा, तर कृणाल पांड्या १२ धावा करून बाद झाला. कोलकात्याकडून प्रसिद्ध क्रिष्णाने २, लॉकी फर्ग्युसनने २, तर सुनील नरेननं एक गडी बाद केला. तर किरॉन पोलार्डला इऑन मोर्गननं धावचीत केलं.