आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइट राइडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबई आणि कोलकाता संघात आतापर्यंत २८ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी २२ सामन्यात मुंबईने, तर ६ सामन्यात कोलकात्याने विजय मिळवला आहे. २०२० मध्ये आबुधाबीत झालेल्या स्पर्धेत एकूण ३ सामने पार पडले होते. त्यापैकी २ सामन्यात मुंबईत, तर एका सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे. कोलकाताविरुद्ध मुंबई इंडियन्स पारडं जड आहे. मात्र असं असलं तरी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मात सावध भूमिका घेताना दिसत आहे.

“मी आकड्यांवर विश्वास ठेवत नाही. कारण टी २० मध्ये आपण मॅचच्या दिवशी कशी कामगिरी करता यावर सर्व अवलंबून असतं. कोलकात्याची टीम चांगली आहे. त्यांचा आतापर्यंतचा खेळ चांगला राहिला आहे. मागच्या सामन्यात बंगळुरूला हरवल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे आमच्यासाठी आजचा सामना वाटतो तितका सोपा नाही. मला माहिती आहे, कोलकात्याविरुद्ध आमची कामगिरी चांगली आहे. पण आम्हाला आजच्या सामन्यासाठी सज्ज राहणं गरजेचं आहे”, असं मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, रोहित शर्माला कोलकाता विरुद्ध एक हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. या सामन्यात रोहितने १८ धावा केल्यास त्याच्या कोलकाता विरुद्ध एक हजार धावा पूर्ण होणार आहेत. त्याच्या आता ९८२ धावा आहेत. रोहित शर्मा फॉर्मात असल्याने आज हा विक्रम तो त्याच्या नावावर करेल, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर येण्याची शक्यताही आहे. आताप्रयंत त्याने एकूण ५,४८० धावा केल्या असून चौथ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात १६ धावा केल्यास तो तिसऱ्या स्थानावर पोहोचणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना सध्या तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या नावावर ५,४९५ धावा आहेत.