इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलचा स्थगित केलेला हंगाम पुढील महिन्यापासून सुरु होत असला तरी दोन महत्वाचे संघ नुकतेच युएईला रवाना झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा संघ ही मालिका पुन्हा सुरु होण्याच्या एक महिना आधीच युएईत पोहचले असून सध्या ते क्वारंटाइन आहेत. मात्र या क्वारंटाइन कालावधीमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला एक खास गोष्ट देण्यात आली असून धोनीचा संघ मात्र याला मुकलाय.
मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंना विशेष जीपीएस घड्याळं देण्यात आली आहेत. ही घड्याळ आबू धाबी आरोग्य विभागाने दिली आहेत. हे सर्व खेळाडू सहा दिवस क्वारंटाइन राहणार असल्याने त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी ही घड्याळ देण्यात आली आहेत.
संघातील प्रत्येक खेळाडूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी आणि गरज पडल्यास खेळाडूंना काही मदत लागली तर ती पुरवता यावी या हेतूने ही घड्याळ देण्यात आली आहे. “मुंबई इंडियन्सच्या संघातील खेळाडूंना जीपीएस घड्याळं देण्यात आली आहेत. त्यांनी ती पुढील सहा दिवस क्वारंटाइनच्या कालावधीदरम्यान घालणं अपेक्षित आहे. हे खेळाडू आबूधाबीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या करोना चाचण्या झाल्यावर त्यांना आरोग्य विभागाने ही घड्याळं दिली आहेत. मागील वर्षीही आबू धाबीमधील करोनाचे नियम हे सक्त होते. दुबईमधून आबू धाबीला येण्यासाठीही चाचण्या करणं आवश्यक होतं,” अशी माहिती सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिलीय.
दुबईमध्ये पोहचलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला अशी घड्याळ देण्यात आलेली नाहीत. “चेन्नईचा संघ हा दुबईमध्ये असून त्यांना अशी घड्याळं देण्यात आलेली नाहीत. दुबईमधील व्यवस्थापनाने त्यांना अशी घड्याळं दिलेली नाही. त्याऐवजी क्वारंटाइनच्या कालावधीमध्ये रोज खेळाडूंच्या करोना चाचण्या केल्या जाणार आहेत,” असं सुत्रांनी स्पष्ट केलं. त्यामुळेच या वॉचच्या माध्यमातून मुंबईच्या खेळाडूंना रोज चाचण्या कराव्या लागणार नसल्या तरी चेन्नईच्या खेळाडूंच्या रोज चाचण्या केल्या जाणार आहेत.
मे महिन्यामध्ये आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने आयपीएलचे १४ वे पर्व स्थगित करण्यात आलं होतं. हे पर्व आता १९ सप्टेंबरपासून दुबईमध्ये सुरु होणार आहे. या पर्वाची सुरुवात मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने होणार आहे. त्यानंतर कोलकाता आणि बेंगळुरुदरम्यान आबू धाबीमध्ये सामाना रंगणार आहे. शारजाहमध्ये २४ सप्टेंबर रोजी बेंगळुरुविरुद्ध चेन्नई सामना रंगेल. दुबईमध्ये १३, शारजाहमध्ये १० तर आबू धाबीत ८ सामने खेळवले जाणार आहे.
बीसीसीआयने यंदा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी विशेष उपाययोजना केली असून एखादा खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येईल. बीसीसीआयने ४६ पानांची नियमांची यादीच जाहीर केली असून आयपीएलशी संबंधित व्यक्तींनी या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलंय.