आयपीएल २०२१चा ३९वा सामना आज दोन दिग्गज संघांमध्ये खेळला जाईल. एका बाजूला पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स तर दुसऱ्या बाजूला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आहे. विराट विरुद्ध रोहित असल्यामुळे दोन्ही संघांमध्ये एक अतिशय रोमांचक सामना होऊ शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात खराब सुरुवात झाली असून दोन्ही संघांनी सलग दोन सामने गमावले आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आणि मुंबई इंडियन्स सहाव्या स्थानावर आहे. आयपीएल २०२१चा उद्घाटन सामना याच दोन्ही संघांमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये आरसीबीने विजय मिळवला. साहजिकच मुंबई इंडियन्स त्या पराभवाचा बदला घेण्यास उत्सुक असेल.

हेड-टू-हेड आकडेवारी

दोन्ही संघांची आकडेवारी पाहायची झाली, तर यात मुंबई इंडियन्सचा वरचष्मा आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये मुंबईने १९ वेळा, तर आरसीबीने ११ वेळा विजय मिळवला आहे. आरसीबीने गेल्या ७ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला फक्त दोनदा पराभूत केले आहे.

भारताबाहेरील सामन्यांबद्दल बोलायचे झाले, तर २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला. त्याचबरोबर गेल्या हंगामात झालेल्या दोन सामन्यांमध्ये आरसीबी आणि मुंबईने प्रत्येकी एकदा विजय मिळवला.

हेही वाचा – CSK vs KKR : ‘भाऊ’ मानलेल्या खेळाडूला धोनीनं केलं संघाबाहेर; जाणून घ्या कारण

कायरन पोलार्डने आरसीबीविरुद्ध मुंबईसाठी सर्वाधिक ५४४ धावा केल्या आहेत. तर आरसीबीकडून कर्णधार विराट कोहलीने मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक ६७० धावा केल्या आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने आरसीबीविरुद्ध १६ सामन्यांमध्ये २१ विकेट्स घेतल्या आहेत.