IPL 2026 Trade Deal Sanju Samson Ravindra Jadeja: आयपीएलच्या इतिहासातील अजून एक मोठी ट्रेड डील पूर्ण झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजासाठीचा ट्रे़ड करार पूर्ण झाला आहे. दोन्ही संघांसाठी हा एक मोठा करार मानला जात आहे. याबाबत चेन्नई सुपर किंग्स व आयपीएलने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
आयपीएलने केलेल्या अधिकृत घोषणेत, रवींद्र जडेजा याला ट्रेड करारातून राजस्थान रॉयल्स संघात सामील झाल्याची माहिती देण्यात आली आहे, तर संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्स संघात सामील झाला आहे.
रवींद्र जडेजा किती कोटींना राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात झाला सामील?
राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा रवींद्र जडेजा २०१२ च्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला आणि तेव्हापासून तो या संघाचा महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. जडेजाने सीएसकेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि तो १२ हंगामांपासून संघाचा भाग आहे.
वरिष्ठ अष्टपैलू आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा माजी कर्णधार रवींद्र जडेजा आता आगामी आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. CSK कडून १२ हंगाम खेळलेला जडेजा लीगमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे, त्याने २५० हून अधिक सामने खेळले आहेत. ट्रेड कराराचा भाग म्हणून, त्याची लीग फी १८ कोटी रुपयांवरून १४ कोटी रुपये करण्यात आली आहे. रवींद्र जडेजा यासह १४ कोटींना राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला आहे. रवींद्र जडेजासह सॅम करनदेखील २.४ कोटी रूपयांना चेन्नई सुपर किंग्स संघातून राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन आता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा भाग असणार आहे. संजू सॅमसन १८ कोटींच्या किमतीसह चेन्नईच्या ताफ्यात सामील झाला आहे. लीगमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक, सॅमसनने १७७ आयपीएल सामने खेळले आहेत. CSK त्याच्या कारकिर्दीतील तिसरी फ्रँचायझी असेल.
संजूने २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं, ज्यामध्ये तो २०१६ आणि २०१७ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता, त्याशिवाय तो आतापर्यंतचे सर्व हंगाम राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे.
