फिक्सिंग आणि वादांच्या वणव्याची पर्वा न करता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पध्रेच्या सातव्या पर्वाच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्वाचे डोळे दिपवले ते भारताच्या युवराज सिंगने. अष्टपैलू युवीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विक्रमी १४ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले आणि सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. भारताच्याच दिनेश कार्तिकनेही १२ कोटी ५० लाख रुपयांची भक्कम कमाई केली आहे.
आयपीएल स्पध्रेसंदर्भातील वादांचे मोहोळ मागे सारून आयपीएलच्या सातव्या पर्वासाठी संघांची बांधणी करण्यासाठी खेळाडूंना ‘कौन बनेगा करोडपती’ची साद घालण्यात आली. बुधवारी उत्साही वातावरणात लिलावाचा पहिला दिवस भारतीय खेळाडूंना मिळालेल्या विक्रमी बोलीमुळे गाजला. भारतीय संघात नियमित स्थान नसलेल्या युवराज आणि कार्तिकला आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा विक्रमी भाव मिळाला आहे. २०११मध्ये गौतम गंभीरला ११ कोटी ४ लाख रुपये विक्रमी बोली लागली होती. तो आयपीएलच्या अर्थबाजारात हा विक्रम मोडीत निघाला.
अ‍ॅशेस मालिकेतील अपयशानंतर इंग्लंडचा वादग्रस्त फलंदाज केव्हिन पीटरसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द नुकतीच संपुष्टात आली. त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने ९ कोटी रुपये इतक्या भरघोस रकमेला खरेदी केले. गेल्या हंगामात तो दिल्लीकडूनच आयपीएल खेळला होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये फक्त ३६ चेंडूंत विश्वविक्रमी शतक झळकावणाऱ्या न्यूझीलंडच्या अष्टपैलू कोरे अँडरसनला मुंबई इंडियन्सने ४ कोटी ५० लाख रुपये रकमेला खरेदी केले आहे. या उदयोन्मुख खेळाडूने अपेक्षेप्रमाणेच लिलावामध्ये आपली छाप पाडली आहे.
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन (६.५ कोटी, किंग्ज इलेव्हन पंजाब), अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (६ कोटी, किंग्ज इलेव्हन पंजाब), दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस (५.५ कोटी, कोलकाता नाइट रायडर्स), भारताचा सलामीवीर मुरली विजय (५ कोटी, दिल्ली डेअरडेव्हिल्स), रॉबिन उथप्पा (५ कोटी, कोलकाता नाइट रायडर्स), वेस्ट इंडिजचा फलंदाज ड्वेन स्मिथ (४.५ कोटी, चेन्नई सुपर किंग्ज), अमित मिश्रा (४.२५ कोटी, सनरायजर्स हैदराबाद) आणि आरोन फिंच (४ कोटी, सनरायजर्स हैदराबाद) या खेळाडूंनी लिलावामध्ये लक्षवेधी कमाई केली.
२०११ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा गाजवणाऱ्या युवराजने त्यानंतर कर्करोगासारख्या दुर्दम्य आजारावर मात केली आणि तो पुन्हा मैदानावर परतला. नुकत्याच जाहीर झालेल्या आशिया चषक स्पध्रेसाठीच्या भारतीय एकदिवसीय संघातून युवीला खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले आहे, परंतु ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेसाठी मात्र त्याने संघातील स्थान टिकवले आहे. मात्र आयपीएलच्या लिलावात युवराजने सर्वानाच मागे टाकले.
त्याचप्रमाणे सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडणाऱ्या  दिनेश कार्तिकची आधारभूत किंमत २ कोटी रुपये होती. मात्र लिलावामध्ये दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात चांगलीच जुंपली. मग कोलकाताने कार्तिकसाठी उत्सुकता दर्शवली. मात्र दिल्लीने या दोघांनाही मागे टाकत कार्तिकला आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.
 ३३ वर्षीय पीटरसन लिलावामध्ये लक्ष वेधणार, असा अंदाज आधीपासूनच वर्तवण्यात आला होता. त्याच्यासाठी चेन्नई, पंजाब आणि दिल्ली अशी तिरंगी टक्कर होती. सनरायजर्स हैदराबाद पीटरसनची बोली जिंकणारसुद्धा होते, परंतु दिल्ली डेअरडेव्हिल्सने संघात कायम ठेवण्याचा (राइट टू मॅच) अधिकार वापरून पीटरसनला गमावू दिले नाही. जॅक कॅलिससाठीसुद्धा चेन्नई आणि दिल्ली यांच्यात सामना रंगला. परंतु कोलकाताने संघात राखण्याचा अधिकार वापरून कॅलिसची बोली जिंकली.
दिल्ली संघाने उत्सुकता न दर्शवलेला भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची आधारभूत किंमत २ कोटी होती. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने ३ कोटी २० लाख रुपये किमतीला खरेदी केले.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू स्टीव्हन स्मिथकरिता राजस्थान रॉयल्सने ४ कोटी रुपये मोजले, तर श्रीलंकेच्या थिसारा परेरासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबने १ कोटी ६० लाख रुपयांची यशस्वी बोली लावली. भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने ३ कोटी २५ लाख (कोलकाता) आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने ३ कोटी ५० लाखांची (दिल्ली) कमाई केली.
अँडरसनची आधारभूत किंमत १ कोटी रुपये होती. त्याला खरेदी करण्यासाठी राजस्थान आणि बंगळुरूने रस घेतला. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि दिल्लीनेही अँडरसनसाठी बोली लावली. त्याच्या आकडय़ाने ४ कोटींचा आकडा ओलांडला तेव्हा दिल्लीने माघार घेतली. हैदराबादने आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर मुंबईच्या नीता अंबानी यांनी बाजी मारली.
प्रदीर्घ काळ भारतीय संघात नसलेला आणखी एक खेळाडू उथप्पानेही ५ कोटी रुपयांची कमाई करीत कोलकाताच्या संघात स्थान मिळवले. २०११च्या लिलावामध्ये त्याला ९ कोटी ६० लाख रुपये भाव मिळाला होता.
२०११च्या लिलावामध्ये एकंदर १८ कोटी रुपये कमावणाऱ्या युसूफ आणि इरफान पठाण या बंधूंना या वेळी अपेक्षित यश मिळाले नाही. युसूफला ३.२५ कोटी (कोलकाता) आणि इरफानला २.४ कोटी (हैदराबाद) भाव मिळाला.
भारताचे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (हैदराबाद) आणि मोहम्मद शमी (दिल्ली) यांच्यावर ४.२५ कोटी इतकी बोली लागली. वरुण आरोनला बंगळुरूने २ कोटी रुपयांना खरेदी केले. सध्या भारताच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांमधून डच्चू मिळालेल्या इशांत शर्माला २.६० कोटी इतक्या रकमेला हैदराबादने खरेदी केले आहे.
या लिलावाद्वारे खेळाडूंना एका वर्षांसाठी करार मिळणार असून, तो फ्रेंचायझींना आणखी दोन वर्षांसाठी वाढविता येऊ शकेल. संपूर्ण संघासाठी ६० कोटी रुपये एकंदर मानधन मर्यादा निश्चित करण्यात आली असून, २०१५ आणि २०१६च्या हंगामांमध्ये त्यात पाच टक्के वाढ होईल.
अभिनेत्री प्रीती झिंटा (किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकीण), उद्योगपती विजय मल्ल्या (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मालक),नीता अंबानी (मुंबई इंडियन्स), राहुल द्रविड (राजस्थान रॉयल्स), अनिल कुंबळे (मुंबई इंडियन्स) या नामांकित मंडळींनी आयपीएलच्या लिलावाला आपल्या संघांसाठी हजेरी लावली.

जयवर्धने, टेलर, व्हाइट यांच्याकडे फ्रँचायझींची पाठ
श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर, गतवर्षी सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्व करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्वेन्टी-२० विशेषज्ञ कॅमेरून व्हाइट, वेस्ट इंडिजचा मार्लन सॅम्युअल्स, वेगवान गोलंदाज डॅनियल ख्रिस्टियन आणि इंग्लंडचा फलंदाज इयान बेली यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना पहिल्या दिवशी आश्चर्यकारकरीत्या कोणत्याही संघांनी खरेदी केले नाही. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेड, फलंदाज डेव्हिड हसी आणि निवृत्त वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांनासुद्धा कुणीही वाली नव्हता.
श्रीलंकेच्या अनेक दिग्गज खेळाडूंकडेही यावेळी फ्रँचायझींनी पाठ फिरवली. कारण आयपीएलच्या सातव्या हंगामाच्या काळातच हा संघ इंग्लंड आणि आर्यलडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे ते संपूर्ण हंगामात अनुपलब्ध राहण्याची शक्यता आहे.

‘‘आयपीएलचे प्रत्येक पर्व अधिकाधिक मोठे होत आहे. सातवे पर्वसुद्धा त्याला अपवाद नसेल. ते क्रिकेटरसिक आणि फ्रँचायझी यांच्यासाठी अधिक मनोरंजक असेल.’’
रणजिब बिस्वाल (आयपीएलचे प्रमुख)

युवीच्या समावेशामुळे आमचा संघ अधिक भक्कम झाला आहे. आम्ही आखलेल्या योजनेपेक्षा ४ कोटी अधिक युवीसाठी मोजले आहेत.
विजय मल्ल्या
(रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मालक)

संघ                                       शिल्लक रक्कम      खेळाडूंचे अधिकार    परदेशी खेळाडू    एकूण खेळाडू
किंग्ज इलेव्हन पंजाब     १४,२०,००,०००           १            ६                १२
राजस्थान रॉयल्स           १२,१०,००,०००            १           ७                ११
कोलकाता नाइट रायडर्स  ९,००,००,०००             ०           ४                १०
दिल्ली डेअरडेव्हिल्स       ८,६०,००,०००             २           ५                १३
सनरायजर्स हैदराबाद      ८,४०,००,०००            ०           ७                 १३
मुंबई इंडियन्स               ५,१५,००,०००            ०           ५                 १०
चेन्नई सुपर किंग्ज         २,९०,००,०००            ०           ७                 १३
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    १,८०,००,०००            १           ७                  १२

कोण कोणत्या संघात-
* मुंबई इंडियन्स-
१. मायकल हसी ५ कोटी (फलंदाज)
२. प्रग्यान ओझा ३.२५ कोटी (गोलंदाज)
३. कोरे अँडरसन ४.५ कोटी (अष्टपैलू)
४. जहीर खान २.६ कोटी (गोलंदाज)
५. जोश हजेलवूड ५० लाख (गोलंदाज)

* रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-
१. युवराज सिंग १४ कोटी (अष्टपैलू)
२. पार्थिव पटेल  १.४  कोटी (यष्टीरक्षक)
३. अशोक दींडा १.५ कोटी (गोलंदाज)
४. रवी रामपॉल ९० लाख (गोलंदाज)
५. मुरलीधरन १ कोटी (गोलंदाज)
६. मिचेल स्टार्क ५ कोटी (गोलंदाज)
७. अॅल्बी मॉरकेल २.४ कोटी (अष्टपैलू)
८. नीक मॅडीनसन ५० लाख (फलंदाज)
९. वरूण अॅरोन २ कोटी (गोलंदाज)

* दिल्ली डेअरडेव्हिल्स-
१. दिनेश कार्तिक १२.५ कोटी (फलंदाज, यष्टीरक्षक)
२. केवीन पीटरसन ९ कोटी (फलंदाज)
३. मुरली विजय  ५ कोटी (फलंदाज)
४. मोहम्मद शामी ४.२५ कोटी (गोलंदाज)
५. सौरव तिवारी ९० लाख (फलंदाज)
६. क्वेन्टन डी कॉक ३.५ कोटी (यष्टीरक्षक)
७. मनोज तिवारी २.८ कोटी (फलंदाज)
८. जेनपॉल ड्यूम्नि २.२ कोटी (फलंदाज)
९. राहुल शर्मा १.९  कोटी (गोलंदाज)
१०. लक्ष्मी रतन शुक्ला १.९ कोटी (अष्टपैलू)
११. सौरभ तिवारी ७० लाख (फलंदाज)
१२. जयदेव उनाडकट २ कोटी (गोलंदाज)
१३. नाथेन कॉल्टर-नेल ४.२५ कोटी (गोलंदाज)

* किंग्ज इलेव्हन पंजाब
१. मिचेल जॉन्सन ६.५ कोटी (गोलंदाज)
२. विरेंद्र सेहवाग ३.२ कोटी (फलंदाज)
३. जेपी ड्युमिनी  १.९ कोटी (फलंदाज)
४. थिसारा परेरा  १.६ कोटी (अष्टपैलू)
५. जॉर्ज बेली ३.५ कोटी (फलंदाज)
६. ग्लेन मॅक्सवेल ६ कोटी (अष्टपैलू)
७. चेतेश्वर पुजारा १.९ कोटी (फलंदाज)
८. व्रिदमान सहा २.२ कोटी (यष्टीरक्षक)
९. शॉन मार्श २.२ कोटी (फलंदाज)
१०. परविंदर अवाना ६५ लाख (गोलंदाज)

* सनरायझर्स हैदराबाद
१. डेव्हिड वॉरनर  ५.५ कोटी (फलंदाज)
२. ईशांत शर्मा २.६ कोटी (गोलंदाज)
३. भुवनेश्वर कुमार ४.२५ कोटी (गोलंदाज)
४. ब्रेन्डेन टेलर ३० लाख (फलंदाज)
५. इरफान पठाण २.४ कोटी (अष्टपैलू)
६. अमित मिश्रा ४.७५ कोटी (गोलंदाज)
७. अॅरॉन फिन्च ४ कोटी (फलंदाज)
८. डॅरेन सॅमी ३.५ कोटी (अष्टपैलू)
९. विनुगोपाल राव ५५ लाख (फलंदाज)
१०. जॅसन होल्डर ७५ लाख (गोलंदाज)

* कोलकाता नाईट रायडर्स
१. जॅक कॅलिस ५.५ कोटी
२. युसुफ पठाण ३.२५ कोटी (अष्टपैलू)
३. शाकीब अल हसन २.८ कोटी (अष्टपैलू)
४. उमेश यादव २.६० कोटी (गोलंदाज)
५. विनय कुमार २.८ कोटी (गोलंदाज)
६. मॉर्ने मॉरकेल २.८ कोटी (फलंदाज)
७. रॉबीन उथप्पा ५ कोटी (फलंदाज)
८. पियुष चावला ४.२५ कोटी (गोलंदाज)

* चेन्नई सुपरकिंग्ज-
१. ड्युप्लेसी ४.७५ कोटी (फलंदाज)
२. ब्रेन्डन मॅक्क्युलम ३.२५ कोटी (यष्टीरक्षक)
३. ड्वेन स्मिथ ४.५० कोटी (फलंदाज)
४. आशिष नेहरा २ कोटी (गोलंदाज)
५. मोहीत शर्मा २ कोटी (गोलंदाज)
६. बेन हिल्फेनहस १ कोटी (गोलंदाज)
७. सॅम्युअल बॅड्रे ३० लाख (गोलंदाज)
८. मॅट हेन्रे ३० लाख (गोलंदाज)

* राजस्थान रॉयल्स-
१. स्विव्हन स्मिथ ४ कोटी (अष्टपैलू)
२. ब्रॅड हॉज २.४ कोटी (फलंदाज)
३. अभिषेक नायर १ कोटी  (अष्टपैलू)
४. टीम साऊथी १.२ कोटी (गोलंदाज)
५. केन रिचर्डसन १ कोटी (गोलंदाज)
६. बेन कटींग ८० लाख (गोलंदाज)