PSL 2025 Postponed: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. २२ एप्रिलला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला. या हल्ल्यात निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर भारतानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानची चांगलीच झोप उडवली आहे. दरम्यान दोन्ही देशांमधील संघर्षमय स्थितीचा परिणाम आता क्रिकेटवरही झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतात आयपीएल तर पाकिस्तानात पीएसएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.
आयपीएल एक आठवड्यासाठी स्थगित
दोन्ही देशांमधील तणावाची स्थिती पाहता, बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावातील १० षटकं झाल्यानंतर सामना थांबवण्यात आला. स्टेडियमच्या लाईट्स बंद करण्यात आल्या. त्यानंतर प्रेक्षकांना बाहेर जाण्यासाठी सांगण्यात आलं. शेवटी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ही स्पर्धा अनिश्तित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आज बीसीसीआयने बैठक घेऊन आयपीएल स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली असल्याची माहिती दिली.
पीएसएल अनिश्चित काळासाठी स्थगित
आयपीएल एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डने देखील मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डने पीएसएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान मुहम्मद शहबाझ शरीफ यांनी सल्ला दिल्यानंतर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचं प्रेस रिलीझमध्ये सांगण्यात आलं आहे. पीसीएलचे अजूनही ८ सामने शिल्लक आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने यूएईकडे स्पर्धेतील उर्वरीत सामने खेळू देण्याची विनंती केली होती. मात्र, भारत- पाकिस्तानातील तणावपूर्वक वातावरण पाहता यूएईने ही मागणी फेटाळून लावली आहे.
त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावी लागली आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत इंग्लंडच्या खेळाडूंनीही सहभाग घेतला आहे. द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, ही स्पर्धा खेळत असलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी पाकिस्तान सोडून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला आहे.