Lucknow Super Giants vs Chennai Super Kings IPL Latest Update : आयपीएल २०२३ चा ४५ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये होत आहे. सीएसकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या लखनऊच्या फलंदाजांची पॉवर प्ले मध्ये दाणादाण उडाली. चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून लखनऊच्या चार फलंदाजांना बाद केलं. केली मायर्स, कर्णधार कृणाल पांड्या, मनन वोहरा आणि मार्कस स्टॉयनिस स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर पूरनने लखनऊची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तो बाद झाल्यानंतर एकट्या आयुष बदोनीने धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे लखनऊने १९.२ षटकात ७ विकेट्स गमावत १२५ धावा केल्या. परंतु, मैदानात पावसाच्या सरी कोसळल्याने सामना अनिर्णीत घोषीत करण्यात आला आणि चेन्नई आणि लखनऊ संघाला प्रत्येकी एक गुण मिळाला आहे.
चेन्नई सुपर किंग्जसाठी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून विकेट्स घेतल्या. महिश तिक्षाणाने भेदक मारा करून दोन विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तिक्षाणाने सलामीवीर फलंदाज मनन वोहराची १० धावांवर असताना दांडी गुल केली. तसंच कर्णधार कृणाल पांड्याला भोपळाही फोडू दिला नाही. पांड्या शून्य धावा करून झेलबाद झाला आणि लखनऊला मोठा धक्का बसला. रविंद्र जडेजाने आक्रमक फलंदाज मार्कस स्टॉयनिसचा ६ धावांवर असताना त्रिफळा उ़डवला. तर मोईन अलीने केली मायर्सला १४ धावांवर झेलबाद केलं. त्यानंतर निकोलस पूरनने लखनऊ संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाथिरानाच्या गोलंदाजीवर पूरन ३१ चेंडूत २० धावांवर झेलबाद झाला. मात्र, आयुष बदोनीने चौफेर फटकेबाजी करत ३३ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं ५९ धावांची नाबाद खेळी केली.
लखनऊ सुपर जायंट्ससाठी युवा फलंदाज आयुष बदोनीने सावध खेळी करून चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मनन वोहराने ११ चेंडूत १० धावा केल्या. केली मायर्स १७ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. कर्णधार कृणाल पांड्या शून्यावर बाद झाला. मार्कस स्टॉयनिसलाही धावांचा सूर गवसला नाही. पण आयुष बदोनीने चांगली फलंदाजी करत लखनऊच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला.