तेराव्या हंगामाचा सलामीचा सामना खेळण्याआधी चेन्नईच्या संघाला एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. करोनाची लागण झालेल्या ऋतुराज गायकवाडचा पहिला करोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. Sportsstar ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार ऋतुराजला पुढील २४ तासांत आणखी एका करोना चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. तो अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच त्याला चेन्नई संघाकडून खेळण्याची परवानगी मिळणार आहे.

स्थानिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला यंदा सुरेश रैनाच्या जागेवर चेन्नईच्या संघात स्थान मिळणार अशी चर्चा होती. परंतू काही दिवसांपूर्वी दीपक चहर आणि ऋतुराज यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला. दीपकने यामधून सावरत करोनावर मात केली, परंतू ऋतुराजला यातून सावरायला थोडा वेळ गेला. मुंबई इंडियन्सविरुद्ध सलामीच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड खेळू शकणार नाहीये. परंतू पुढच्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यास ऋतुराज चेन्नईच्या आगामी सामन्यांमध्ये खेळू शकतो.

२०१९ साली महाराष्ट्राच्या या खेळाडूला चेन्नई सुपरकिंग्जने संघात स्थान दिलं. भारत अ आणि स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळताना ऋतुराजने कमालीची कामगिरी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. सुरेश रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातून माघार घेतल्यानंतर ऋतुराजला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली होती…परंतू दरम्यानच्या काळात करोनाची लागण झाल्यामुळे त्याला सलामीच्या सामन्याला मुकावं लागणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 MI vs CSK Preview : सलामीच्या सामन्यात कोण मारेल बाजी??