IPL Playoffs Scenario For All Teams: आयपीएल २०२५ स्पर्धेतील निम्म्याहून अधिक सामने पूर्ण झाले आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएल २०२५ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. अनुभवी खेळाडूंचा संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला या हंगामातील १० पैकी ८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. उर्वरित सामने जिंकूनही चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाही. त्यामुळे हा संघ अधिकृतरित्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दरम्यान इतर संघांसाठी कसं असेल प्लेऑफमध्ये जाण्याचं समीकरण? जाणून घ्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत १० पैकी ७ सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार हे तर निश्चित आहे. यासह या संघाचं लक्ष पहिले किंवा दुसरे स्थान मिळवण्यावर असणार आहे. उर्वरित ४ पैकी १ सामना जिंकून हा संघ प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करेल. तर जास्त सामने जिंकून पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानी पोहोचू शकतो.

पंजाब किंग्ज: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाबने आतापर्यंत १० पैकी ६ सामने जिंकले आहेत. पंजाबला प्लेऑफ गाठण्यासाठी इथून पुढे आणखी २ सामने जिंकावे लागतील. तर टॉप २ मध्ये पोहोचण्यासाठी या संघाला ३ सामने जिंकावे लागतील.

मुंबई इंडियन्स: मुंबई इंडियन्सचा संघ सध्या १० पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे. मुंबईने सलग ५ सामने जिंकले आहेत. जर मुंबईला १६ अंकापर्यंत पोहोचायचं असेल, तर उर्वरित ४ पैकी २ सामने जिंकावे लागतील.

गुजरात टायटन्स: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातला देखील प्लेऑफ गाठण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. ९ सामन्यांमध्ये गुजरातने १२ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे गुजरातला देखील कमीत कमी २ सामने जिंकावे लागणार आहेत.

दिल्ली कॅपिटल्स: दमदार सुरूवात करणारा दिल्लीचा संघ सध्या संघर्ष करताना दिसत आहे. गेल्या २ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीसाठीही समीकरण सोपं आहे. उर्वरित ४ पैकी २ सामने जिंकून दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो.

लखनऊ सुपर जायंट्स: लखनऊ सुपर जायंट्सला प्लेऑफ गाठणं जरा कठीण आहे. कारण या संघाला उर्वरित ४ पैकी ३ सामने जिंकावे लागणार आहेत. इथून पुढे लखनऊने २ सामने गमावले तर लखनऊचा संघ स्पर्धेतून बाहेर पडू शकतो.

कोलकाता नाईट रायडर्स: गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला १० पैकी ४ सामने जिंकता आले आहेत. तर एक सामना पावसामुळे धुतला गेला होता. या संघाने आतापर्यंत ९ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे १६ गुणांचा पल्ला गाठण्यासाठी या संघाला इथून पुढे सर्व सामने जिंकावे लागतील. एकही सामना गमावला तर हा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.

राजस्थान रॉयल्स : चेन्नई सुपर किंग्जनंतर राजस्थानचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरू शकतो. या संघाने एकही सामना गमावला तरी हा संघ स्पर्धेतून बाहेर पडू शकतो.

सनरायझर्स हैदराबाद : हैदराबदला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. या संघाने जर स्पर्धेतील उर्वरित सर्व सामने जिंकले तर हा संघ १६ गुणांपर्यंत पोहचू शकतो. मात्र एकही सामना गमावला तर हा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.