Ajinkya Rahane on KKR vs CSK: रविवारी (२३ एप्रिल) रात्री कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेचा फलंदाजीतील आक्रमक अवतार पुन्हा पाहायला मिळाला. रहाणेने २९ चेंडूत ७१ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या खेळीमुळे चेन्नईने कोलकाताविरुद्ध २३५ धावांची मोठी धावसंख्या उभारली, प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ फक्त १८६ धावाच करू शकला. फक्त ‘प्लेअर ऑफ द मॅच’ रहाणेची निवड झाली. येथे त्याला या आयपीएलमधील अप्रतिम खेळीबद्दल विचारण्यात आले, त्यानंतर या अनुभवी खेळाडूने या खेळींचा मानसिकतेशी संबंध जोडला.

रहाणे म्हणाला, “स्पष्ट मानसिकता आहे, बाकी काही नाही. तुमची मानसिकता योग्य असेल तर तुम्ही काहीही करू शकता आणि म्हणूनच मला माझे मनात कुठल्याही नकारात्मक भावना न येऊ देता मोकळेपणाने फलंदाजी करायची आहे. तसे, या हंगामापूर्वी माझी तयारीही चांगली होती. कोलकाताविरुद्धच्या खेळीबद्दल रहाणे म्हणाला, “बॉल थोडा बॅटवर उशीरा येत होता आणि खेळपट्टी थोडी स्लो होती. पण आउटफिल्ड खूप वेगवान होते. एका बाजूची बाऊंड्री सुद्धा खूपच लहान होती, त्यामुळे फटके मारताना मजा येत होती.”

हेही वाचा: Sachin Tendulkar Birthday: ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान!’ सचिन, सचिन… साडेपाच फुटाचा मुलगा कसा बनला ‘क्रिकेटचा देव’, जाणून घ्या

रहाणेने धोनीचे केले कौतुक

रहाणे म्हणाला, “या मोसमात मी माझ्या सर्व डावांचा पुरेपूर आनंद घेतला आहे आणि मला वाटते की माझा सर्वोत्तम खेळ अजून यायचा आहे.” येथे रहाणेने धोनीचेही कौतुक केले. तो धोनीविषयी म्हणाला, “एमएसच्या नेतृत्वाखाली खेळणे म्हणजे खूप काही शिकण्याची संधी असते आणि ती मला वाया घालवायची नव्हती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताकडून खेळणे आणि नंतर त्याच्याच नेतृत्वाखाली प्रथमच चेन्नईकडून खेळणे हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव आहे, तो जे काही बोलतो ते तुम्ही ऐकलात तर गोष्टी सोप्या होतात. त्याचा विचार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे म्हणूनच तो इतरांपेक्षा वेगळा कर्णधार आहे.”

हेही वाचा: IPL 2023: हिरव्या जर्सीतला विराट कमनशिबीच! तब्बल इतक्या दिवसांनी कर्णधार म्हणून उतरला आणि गोल्डन डकवर माघारी परतला

सरासरी ५२ आणि स्ट्राइक रेट १९९

अजिंक्य रहाणेने या हंगामातील पाच सामन्यात ५२.२५च्या सरासरीने आणि १९९च्या स्फोटक स्ट्राईक रेटने २०९ धावा केल्या आहेत. त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. रहाणे गेल्या १५ महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. जानेवारी २०२२ मध्ये, त्याने भारतीय संघासाठी शेवटची कसोटी खेळली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याची त्याची इच्छा आहे आणि त्याने ते वेळोवेळी बोलूनही दाखवले आहे.