Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Score Updates: शनिवारच्या (दि. ६ मे) डबल हेडर सामन्यातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात संपन्न झाला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या विराट कोहलीने त्याच्या होम ग्राऊंडवर शानदार अर्धशतक झळकावले. त्याचसोबत महिपाल लोमरोरने आक्रमक फटकेबाजी करत आपले आयपीएल कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साजरे केले. त्या दोघांचे अर्धशतक व्यर्थ ठरले. फिलीप सॉल्टच्या तुफानी खेळीने दिल्लीला विजयाच्या नजीक नेऊन ठेवले आणि सात विकेट्सने बंगळुरूवर मात करत प्ले ऑफचे गणित बिघडवले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या बंगळुरू संघाने चांगली सुरुवात केली. बंगळुरूने २० षटकांत ४ गडी गमावून १८१ धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी करत संघाला ८०च्या पुढे नेले. ११व्या षटकात त्यांना पहिला धक्का बसला. संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस ४५ धावांवर मिचेल मार्शकरवी बाद केले. यानंतर ग्लेन मॅक्सवेल भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीही अर्धशतकी खेळी खेळून बाद झाला. त्याने ५ चौकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. मुकेश कुमारने त्याला खलील अहमदकडे झेलबाद केले. दिनेश कार्तिक मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने केवळ ११ धावा केल्या. महिपाल लोमरने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने २९ चेंडूत ५४ धावा केल्या. दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक २ बळी घेतले.
प्रत्युत्तरात दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. सहाव्या षटकात संघाला पहिला धक्का बसला. कर्णधार डेव्हिड वॉर्नरला मोठी खेळी खेळता आली नाही. तो अवघ्या २२ धावांवर बाद झाला. यानंतर मिचेल मार्शही २६ धावांवर बाद झाला. यानंतर फिलीप सॉल्ट आणि रिले रोसौ यांनी शानदार भागीदारी करत संघाला १७५ पर्यंत नेले. फिल सॉल्ट अर्धशतकी खेळी खेळून बाद झाला. त्याने ४५ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ८७ धावा केल्या. रिले रॉसौने ३३ चेंडूत एक चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३५ धावांची नाबाद खेळी केली, तर अक्षर पटेलने ३ चेंडूत ८ धावा करत नाबाद राहिला. बंगळुरूकडून जोश हेझलवूड, कर्ण शर्मा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा सात गडी राखून पराभव करत मोसमातील चौथा विजय मिळवला. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत १०व्या स्थानावरून ९व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचे १० सामन्यांत १० गुण झाले असून तो पाचव्या स्थानावर आहे. दिल्लीला आपला पुढील सामना १० मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. दुसरीकडे, आरसीबी संघ ९ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे.