Delhi Capitals suffered a major blow as Mitchell Marsh : आयपीएलच्या १७व्या हंगामात ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श दुखापतीमुळे मायदेश परतला आहे. मार्श उजव्या हाताच्या दुखापतीवर उपचारासाठी ऑस्ट्रेलियात परतल्याने दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, मार्शला जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार नियुक्त केला जाण्याची शक्यता आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का –

दिल्ली संघ व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेनंतर त्याला परत बोलावण्यात आले. मात्र, चालू हंगामात त्याच्या उपलब्धतेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मार्शने दिल्ली संघाकडून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या संघाच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये मार्श खेळू शकला नाही. मार्शची या मोसमात राजस्थान रॉयल्सविरुद्धची २३ धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे. दिल्लीने हा सामना गमावला होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याला खातेही उघडण्यात अपयश आले. मार्शशिवाय ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीतही वाढ झाली आहे.

मिचेल मार्श उपचारासाठी ऑस्ट्रेलियाला परतला –

हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मिचेल मार्श कॅपिटल्ससाठी शेवटचे दोन सामने खेळू शकला नव्हता. त्यामुळे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी अष्टपैलू खेळाडू आठवडाभर मैदानाबाहेर राहणार असल्याचे संकेत दिले होते. आता ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, मार्श त्याच्या उजव्या हाताच्या दुखापतीवर उपचारासाठी ऑस्ट्रेलियाला परतला आहे. याशिवाय तो संपूर्ण हंगामाला मुकेल असे मानले जात आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्या मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यानंतर मार्शच्या दुखापतीबद्दल अमरे यांनी खुलासा केला होता.

हेही वाचा – PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल

गुणतालिकेत दिल्लीचा संघ नवव्या क्रमांकावर –

दिल्ली कॅपिटल्स संघाने या आयपीएल हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. संघाने आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत, तर ४ सामन्यात हार पत्करली आहे. दिल्लीने चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचे सामने जिंकले आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतच्या संघाला मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली संघ ४ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.