Abhishek Sharma Digvesh Rathi Fight BCCI Tok Action : आयपीएल २०२५ मध्ये सोमवारी (१९ मे) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या संघांमध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दोन भारतीय खेळाडू एकमेकांविरूद्ध वाद घालताना दिसले. या रोमांचक सामन्यात हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा वादळी फटकेबाजी करताना दिसला. अभिषेक शर्माने लखनौने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. पण, यादरम्यान त्याचा दिग्वेश राठीबरोबर वाद झाला.

सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा झेलबाद झाल्यानंतर दिग्वेश राठीवर चांगलाच संतापलेला दिसला. लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठीने अभिषेकला बाद केलं आणि संघाला महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंचांना आणि इतर खेळाडूंनाही हस्तक्षेप करावा लागला. पण दोन्ही खेळाडू एकमेकांच्या जवळ जात जोरदार वाद घालताना, हातवारे करताना दिसले.

दिग्वेश राठीवर मोठी कारवाई

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिग्वेश राठी व अभिषेक शर्मा या दोघांवरही कारवाई केली आहे. आयपीएल कोड ऑफ कंडक्ट मोडल्यामुळे बीसीसीआयने दिग्वेश राठीवर एका सामन्याची बंदी व ५० टक्के (सामना शुल्कापैकी) दंड ठोठावला आहे. तर, अभिषेकला सामना शुल्कापैकी २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. त्याच्या नावावर एका डिमेरिट प्वाइंटची नोंद करण्यात आली आहे. दिग्वेश राठीवर मैदानात खेळभावना न जपल्यामुळे तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर आयपीएलच्या कलम २.५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

अभिषेक शर्मा काय म्हणाला?

सामना संपल्यानंतर पंच व बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी राठी व शर्माशी बातचीत केली आणि प्रकरण शांत केलं. अभिषेक शर्मा म्हणाला, “आमच्यातला वाद निवळला असून सर्व काही ठीक आहे”. त्यापाठोपाठ दोन्ही खेळाडू एकमेकांबरोबर बोलताना, हस्तांदोलन करताना दिसले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्वेश राठीवर एका सामन्याची बंदी

तीन सामन्यांमध्ये दिग्वेश राठीने खेळभावनेचं उल्लंघन केलं आहे. त्याच्यावर पाच डिमेरिट प्वाइंटची नोंद आहे. त्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. लखनौचा पुढचा सामना अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरोधात खेळवला जाणार आहे. या सामन्यात दिग्वेशला मैदानाबाहेर बसावं लागणार आहे.