GT vs CSK Highlights: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ६७ वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दमदार विजयाची नोंद केला आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. मात्र एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने विजयाने शेवट केला आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जकडून सलामी जोडीने दमदार सुरूवात करून दिली. आयुष म्हात्रेने १७ चेंडूत ताबडतोड ३४ धावांची खेळी केली. तर डेवोन कॉनव्हेने ३५ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना उर्विल पटेलने १९ चेंडूत ३७ धावा केल्या. शेवटी डेवाल्ड ब्रेविसने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने २३ चेंडूत ५७ धावांची वादळी खेळी केली. त्याला साथ देत रविंद्र जडेजाने नाबाद २१ धावांची खेळी केली. यासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकांअखेर ५ गडी बाद २३० धावा केल्या.
चेन्नईचा ८३ धावांनी पराभव
गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या साई सुदर्शनने ४१ धावांची तुफानी खेळी केली. मात्र, शुबमन गिलला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. तो अवघ्या १३ धावा करत माघारी परतला. सलामी जोडी फ्लॉप ठरल्यानंतर जोस बटलरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, तो अवघ्या ५ धावा करत माघारी परतला. शेरफेन रूदरफोर्ड ०, शाहरुख खान १९, राहुल तेवतीया १४ आणि राशिद खान अवघ्या १२ धावांवर माघारी परतला. शेवटी अरशद खानने २० धावा केल्या. मात्र, चेन्नईच्या धारदार गोलंदाजीसमोर गुजरातच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. यासह चेन्नईने हा सामना ८३ धावांनी आपल्या नावावर केला.
गुजरातची टॉप २ मध्ये एन्ट्री करण्याची संधी हुकली
हा सामना जिंकून गुजरात टायटन्स संघाला गुणतालिकेत टॉप २ मध्ये एन्ट्री करण्याची संधी होती. मात्र, ही संधी गुजरातने गमावली आहे. आता मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जकडे नंबर १ स्थानी पोहोचण्याची संधी आहे.