‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणानंतर आता खळबळजनक माहिती हळूहळू समोर येऊ लागली आहे. भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडूंना सट्टेबाजांकडून गाडय़ा, मुली आणि महागडय़ा भेटवस्तूंची आमिषे दाखवली जात असत, अशी कबुली ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात अडकलेल्या एस. श्रीशांतने दिली आहे.
क्रिकेटपटू आणि सट्टेबाजांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता अनेक गौफ्यस्पोट होऊ लागले आहेत. सट्टेबाजांनी राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना खरेदीसाठी नेले असता, चंडिलाने अडीच लाखांच्या दोन जीन्स आणि महागडी घडय़ाळे विकत घेतली होती. सट्टेबाजांची अशीच कार्यपद्धती असते, असे पोलिसांनी म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कार्टर रोडवर श्रीशांतला अटक केली, त्या वेळी त्याच्यासोबत एक बॉलीवूड अभिनेत्री आणि अन्य दोन मुली कारमध्ये होत्या. त्या वेळी या अधिकाऱ्यांनी आपले ओळखपत्र श्रीशांतला दाखवले, पण कोणत्या कारणासाठी श्रीशांतला अटक करत आहोत यामागचे कारण गुप्त ठेवले. श्रीशांतचा फोन पोलीस निरीक्षकाने जप्त केल्यानंतर तो वारंवार त्याच्या फोनवरून महाराष्ट्र, केरळ आणि अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करावा, अशा विनवण्या पोलिसांना करत होता, असेही सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, ‘‘अटक केल्यानंतर पोलीस श्रीशांतला इनोव्हा कारमधून घेऊन गेले. ही माहिती उघड होऊ नये यासाठी अटकेमागचे कारण गुप्त ठेवण्याचे आदेश या विशेष पथकाला देण्यात आले होते. तुम्ही मला अटक करून योग्य केले नाही, माझ्या मोठमोठय़ा लोकांशी ओळखी आहेत, असे श्रीशांत पोलिसांना धमकावत होता. दरम्यान, त्याच वेळी पोलिसांच्या अन्य पथकाने राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू आणि बुकी अमित सिंग याला अटक केली. चार जणांच्या आणखी एका पथकाने अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना ताब्यात घेतले. सर्व खेळाडूंना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांची सर्व पथके मरिन ड्राइव्हवर दाखल झाली. याबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. नंतर खेळाडूंना एका विमानाने मुंबईहून दिल्लीला नेण्यात आले.
त्या मॉडेल्स श्रीशांतची खाजगी बाब
श्रीशांतला अटक केली तेव्हा त्याच्यासोबत तीन मॉडेल्स होत्या. याशिवाय श्रीशांतच्या लॅपटॉपमध्येही शेकडो मुलींची छायाचित्रे आढळली आहेत. या मॉडेल्स या चित्रपटसृष्टीतील होतकरू तरुणी (स्ट्रगलर्स) आहेत. श्रीशांतने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करावे, ही त्याची खासगी बाब आहे. जोपर्यंत या मॉडेल्सचा मॅच फिक्सिंग प्रकरणाशी संबंध येत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी स्पष्ट केले. दरम्यान, श्रीशांतच्या हॉटेलमधील खोलीतून पोलिसांना काही आक्षेपार्ह वस्तू आढळल्या होत्या. परंतु त्याही खासगी बाबी असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

.म्हणून श्रीशांत मुंबई पोलिसांच्या हाती लागला नाही.
सट्टेबाजी प्रकरणी सूत्रधार बुकी रमेश व्यास याला मुंबई पोलिसांनी पकडले असले तरी दिल्ली पोलिसांनी मुंबईत येऊन क्रिकेटपटूंना अटक केली. त्यासंबंधीचे स्पष्टीकरण हिमांशू रॉय यांनी केले. मुंबई पोलिसांच्या मालमत्ता विभागाने १३ मे रोजी रमेश व्यास याला अटक केली होती. हा रमेश व्यास दुबई, पाकसहीत इतर सट्टेबाजांच्या संपर्कात होता. पण दिल्ली पोलिसांनी ज्या ज्युपिटर आणि टिकू या सट्टेबाजांना अटक केली ते थेट खेळाडूंच्या संपर्कात होते. त्यामुळेच दिल्ली पोलीस श्रीशांत आणि इतर खेळाडूंना पकडू शकले, असे रॉय यांनी स्पष्ट केले. मुंबई पोलिसांनी श्रीशांतचे जे साहित्य जप्त केले आहे, ते तपासासाठी देण्याची विनंतीही दिल्ली पोलिसांनी आपल्याला केल्याचेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inducement of cars girls shrishant
First published on: 21-05-2013 at 03:47 IST