पॅट कमिन्सचं नाबाद अर्धशतक आणि कर्णधार मॉर्गनने त्याला दिलेली भक्कम साथ या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सविरोधात १४८ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार मॉर्गनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर कोलकात्याच्या आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी पुरती निराशा केली. राहुल त्रिपाठी, नितीश राणा, शुबमन गिल, दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल हे फलंदाज झटपट बाद झाले.

मात्र यानंतर मैदानावर आलेल्या पॅट कमिन्सने कर्णधार मॉर्गनसोबत सावध खेळी करत संघाचा डाव सावरला. कमिन्सने मैदानावर स्थिरावल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. ३६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने कमिन्सने नाबाद ५३ धावांची खेळी केली. महत्वाची गोष्ट म्हणजे तेराव्या हंगामात २३ सप्टेंबर रोजी कोलकाता आणि मुंबई यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात कमिन्सनेच कोलकात्याकडून सर्वाधिक धावांची खेळी केली होती. या सामन्यात कमिन्सने ३३ धावा केल्या होत्या. आपला हाच फॉर्म कायम ठेवत कमिन्सने मुंबईविरुद्ध सामन्यात आजच्या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळीची नोंद केली.

तेराव्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावात KKR ने कमिन्सवर १५.५० कोटींची बोली लावली होती. कमिन्सने गोलंदाजीत चांगली कामगिरी करणं KKR ला अपेक्षित होतं. परंतू गोलंदाजीत कमिन्सकडून संमिश्र कामगिरी झाली असली तरी फलंदाजीत त्याने याची कसर भरून काढली आहे.

मुंबई इंडियन्सकडून राहुल चहरने २ तर ट्रेंट बोल्ट- कुल्टर-नाईल – बुमराह या त्रिकुटाने प्रत्येकी १-१ बळी घेतला. KKR च्या आघाडीच्या फळीला झटपट माघारी धाडण्यात यशस्वी झालेले मुंबईचे फलंदाज कमिन्स आणि मॉर्गनची जोडी फोडू शकले नाहीत.