आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई आणि पंजाब यांच्यात अकरावा सामना खेळवला गेला. चेन्नईने आजचा तिसरा सामनादेखील गमावला आहे. चेन्नईचा पहिल्या फळीतील एकही खेळाडू चांगली कामगिरी करु शकला नाही. कर्णधार रविंद्र जाडेजा तर चक्क शून्यावर बाद झाला. जाडेजा शून्यावर बाद झाल्यानंतर त्याला राग अनावर झाला. बाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने थेट स्टंप्सला हाताने मारलंय.

जडेजाचा त्रिफळा उडाला, पुढे काय झालं ?

मोईन अली खातंही न खोलता बाद झाल्यानंतर कर्णधार रविंद्र जाडेजा फलंदाजीसाठी उतरला. पहिले दोन चेंडू खेळल्यानंतर अर्षदीपने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूचा सामना करताना जाडेजा गोंधळला. अर्षदीपने टाकलेल्या चेंडूवर जाडेजाने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची किनार घेत थेट स्टंपला लागला. काही समजायच्या आत स्टंपच्या बेल हवेत उडाल्या. परिणामी रविंद्र जाडेजा शून्यावर बाद झाला. त्यानंतर संघाला गरज असताना आपण शून्यावर बाद झाल्यामुळे रविंद्र जाडेजाला राग अनावर झाला. त्याने तंबुत परतताना चिडून स्टंप्सवर हाताने मारले.

दरम्यान, चैन्नई संघाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून खराब खेळ केला. शिवम दुबे वगळता एकही फलंदाज चांगली धावसंख्या उभी करु शकला नाही. जाडेजासोबतच चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली,ड्वेन ब्राव्हो शून्यावर तर ऋतुराज गायकवाड एक धाव करून बाद झाला.