आयपीएल क्रिकेटमधील चेन्नई आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यामध्ये चेन्नईचा लाजीरवाणा पराभव झाला असून चेन्नईने या हंगामात सलग तीन सामने गमावले आहेत. दरम्यान चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामन्यामध्ये पंजाबचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनने केलेल्या दिमाखदार खेळाची चर्चा होत आहे. त्याने फलंदाजीमध्ये मोठी कामगिरी केली. मात्र या सामन्यात लिव्हिंगस्टोन गोलंदाजी आणि क्षेत्ररणामध्येही आपली छाप पाडून गेला. त्याने ड्वेन ब्राव्होचा टिपलेला झेल तर खास चर्चेचा विषय ठऱतोय.

पंजाबने चेन्नईसमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले. ही धावसंख्या गाठण्यासाठी आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, रविंद्र जाडेजा यांनी निराशा केली. त्यानंतर धोनी आणि शिवम दुबे यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबे ५७ धावांचा अर्धशतकी खेळ करुन बाद झाल्यानंतर धोनीला साथ देण्यासाठी ड्वेन ब्राव्हो मैदानात आला. मात्र ब्राव्होनेदेखील सर्वांनाच निराश केलं.

चेन्नईची स्थिती ९८ धावांवर सहा गडी बाद अशी असताना ड्वेन ब्राव्हो फलंदाजीसाठी उतरला होता. तो चांगली फटकेबाजी करून संघाला विजयापर्यंत नेईल अशी अपेक्षा केली जात होती. मैदानात उतरल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. लिव्हिंगस्टोनने चेंडू टाकताच ब्राव्होने बचावात्मक पवित्रा घेतला. त्याने चेंडूसमोर बॅट पकडली. मात्र बॅटला लागताच चेंडू हवेत गोलंदाजी करत असलेल्या लिव्हिंगस्टोनकडे गेला. ही संधी साधत लिव्हिंगस्टोनने झेप घेत चेंडू हवेतच टिपला. त्यामुळे अनपेक्षितपणे ब्राव्हो झेलबाद झाला. ब्राव्होला शून्यावर बाद करण्यासाठी लिव्हिंगस्टोनने घेतलेली झेप चांगलीच चर्चेची ठरली. लिव्हिंगस्टोनने एकून दोन बळी घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान फलंदाजीमध्येही लिव्हिंगस्टोने मोठी कामगिरी केली. त्याने ३२ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. त्याच्या या खेळामुळेच पंजाब संघ १८० धावा उभारू शकला.