महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांची जोडी जशी भारतात जय-वीरूची जोडी म्हणून ओळखली जाते, त्याचप्रमाणे वेस्ट इंडिजमध्ये ड्वेन ब्राव्हो आणि किरॉन पोलार्डची जोडी प्रसिद्ध आहे. हे दोघेही जेव्हा वेस्ट इंडिजसाठी मैदानात उतरायचे तेव्हा त्यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळायची. पण आयपीएलमध्ये हे दोन खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. किरॉन पोलार्ड मुंबई इंडियाचा भाग आहे, तर ड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो.

मात्र गुरुवारच्या सामन्यापूर्वी दोन्ही खेळाडूंची भेट झाली तेव्हा ड्वेन ब्राव्हो किरॉन पोलार्डच्या पायाला स्पर्श करताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ जेव्हा फलंदाजी करत होता, त्यावेळी या दोन दिग्गजांमध्ये मजेदार बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले. पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्हो आमनेसामने आल्यावर चाहत्यांना खूप ड्रामा पाहायला मिळाला.

पोलार्ड फलंदाजीला आला तेव्हा ड्वेन ब्राव्हो गोलंदाजी करत होता. यादरम्यान, ब्राव्होच्या एका चेंडूवर पोलार्डने बचावात्मक शॉट खेळला. चेंडू थेट ब्राव्होकडे गेला आणि त्याने चेंडू वेगाने पोलार्डच्या दिशेने फेकला. चेंडू पोलार्डकडे येताच त्याने बॅट फिरवली. मात्र, चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही. यानंतर पोलार्ड धावत ब्राव्होकडे आला आणि त्याने त्याच्या कपाळावर चुंबन घेतले.

किरॉन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्हो जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळताना दिसतात. पोलार्डच्या टी-२० कारकिर्दीमध्ये जागतिक क्रिकेटमध्ये १०,००० हून अधिक धावा आहेत. तसेच ३०० हून अधिक बळी घेणारा तो एकमेव खेळाडू आहे. पोलार्डच्या नावावर टी-२० मध्ये ११५०९ धावांसह ३०५ बळी आहेत. दुसरीकडे, ड्वेन ब्राव्हो हा क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक ५८१ बळी घेणारा गोलंदाज आहे.

दरम्यान, या सामन्यातही पोलार्ड फलंदाजीत अपयशी ठरला. नऊ चेंडूत १४ धावा करून तो बाद झाला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. महिष टीक्षानाच्या चेंडूवर पोलार्डला शिवम दुबेने झेलबाद केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत सात गडी गमावून १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या सहा चेंडूत विजयासाठी १७ धावांची गरज होती आणि जयदेव उनाडकटच्या या षटकात धोनीने एक षटकार आणि दोन चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला. धोनीने १३ चेंडूत २८ धावा केल्या.