चेन्नई : गतविजेता चेन्नई सुपर किंग्जचा संघ सलग दोन पराभवांनंतर आज, सोमवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या ‘आयपीएल’ सामन्यात विजयी पुनरागमनासाठी उत्सुक असेल. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या कामगिरीवर लक्ष असेल. या दोघांना यंदाच्या हंगामात फारशी चमक दाखवता आलेली नाही.  

सलग दोन पराभवांनंतर चेन्नईवर घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी दडपण असेल. चेन्नईच्या संघाने चारपैकी दोन सामन्यांत विजय मिळवले असून ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी आपले दोनही विजय घरच्या मैदानावरच मिळवले आहेत.

हेही वाचा >>> LSG vs GT : विदर्भवीर ठाकूरचं घवघवीत ‘यश’ ; ५ विकेट्ससह लखनऊच्या विजयात सिंहाचा वाटा

दुसरीकडे, कोलकाताचा संघ या हंगामात चांगल्या लयीत असून सांघिक कामगिरीच्या बळावर त्यांनी आतापर्यंत खेळलेले तीनही सामने जिंकले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. कर्णधार श्रेयस वगळता कोलकाताचे फलंदाज लयीत आहेत. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे.

कोलकाताची रसेल, नरेनवर मदार

कोलकाता आणि राजस्थान रॉयल्स हे दोनच संघ यंदाच्या स्पर्धेत अजून अपराजित राहिले आहेत. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू सुनील नरेनला सलामीला पाठवणे कोलकातासाठी फायदेशीर ठरले आहे. नरेन आणि फिल सॉल्ट कोलकाताच्या डावाची आक्रमक सुरुवात करत आहेत. त्यामुळे या दोघांना रोखण्याचे चेन्नईसमोर आव्हान असेल. मध्यक्रमात कर्णधार श्रेयसने कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. रिंकू सिंह आणि आंद्रे रसेल यांनी विजयवीराची भूमिका चोख बजावली आहे. रसेलने दोन डावांत तब्बल २३८.६३च्या स्ट्राईक रेटने १०५ धावा फटकावल्या आहेत.

सलामीवीरांकडून सुधारणेची अपेक्षा

चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि डावखुरा रचिन रवींद्र या सलामीवीरांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करताना ‘पॉवरप्ले’मध्ये संघाला आक्रमक सुरुवात करून देणे अपेक्षित आहे. यंदा चेन्नईकडून डावखुऱ्या शिवम दुबेने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने चार सामन्यांत १४८ धावा केल्या आहेत. वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान आणि मथीश पथिराना वेगवेगळया कारणांमुळे गेल्या सामन्यात खेळू शकले नाहीत. त्यामुळे चेन्नईची गोलंदाजी कमकुवत भासली. हे दोघे कोलकाताविरुद्धही न खेळल्यास अन्य गोलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल.

वेळ : सायं. ७.३० वा. ’

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.