चेन्नई आणि कोलकाताविरूद्धच्या सामन्यानंतर २०११ च्या विश्वचषकातील हिरो धोनी आणि गंभीर एकमेकांची गळाभेट घेताना दिसले. या दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. चेन्नई-कोलकाताच्या सामन्यात सीएसके घरच्या मैदानावर केकेआरचा विजयरथ रोखला. सध्याचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सात गडी राखून पराभव केला. यासह केकेआरला यंदाच्या हंगामातील पहिला पराभव पत्करावा लागला.

चेपॉकवर प्रथम गोलंदाजी करताना चेन्नईने कोलकात्याला ९ बाद १३७ धावांवर रोखले आणि नंतर १७.४ षटकात तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. फलंदाजीत ऋतुराज गायकवाड आणि गोलंदाजी बाजूमध्ये जडेजा आणि तुषार देशपांडे यांनी शानदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. पण सामन्यापेक्षाही जास्त चर्चा धोनी आणि गंभीरच्या भेटीची होत आहे.

सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत असतानाच गंभीर आणि धोनी समोरासमोर आले. यानंतर दोन्ही दिग्गजांनी एकमेकांची गळाभेट घेतली. धोनी आणि गंभीरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये धोनी प्रथम केकेआरच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करताना दिसत आहे आणि नंतर काही वेळाने तो गंभीरलाही भेटतो. धोनीने गंभीरशी हस्तांदोलन करून गळाभेट घेताना काहीतरी बोलतानाही दिसत आहे.

२०११ च्या विश्वचषकात धोनी आणि गंभीर दोघेही भारताच्या विजयाचे हिरो होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात धोनीने ७९ चेंडूत ९१ धावांची नाबाद खेळी खेळली, तर गंभीरने ९७ धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी करून भारताला दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. गंभीर नेहमी धोनीवर टिका करतो, त्याच्याविरूद्ध वक्तव्य करतो, असे चाहते अनेकदा टीका करत असतात. त्यामुळे दोघांमध्ये काही अलबेल नसल्याच्या अनेकदा चर्चा होतात, पण या दोघांच्या या गळाभेटीनंतर नक्कीच या चर्चांना पूर्णविराम मिळेल.